कोरोनाचा लाभ उठवत देशविरोधी शक्ती अविश्वासाचे वातावरण तयार करण्याची शक्यता - Taking advantage of the Corona situation, anti-national forces are likely to create an atmosphere of mistrust | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.

कोरोनाचा लाभ उठवत देशविरोधी शक्ती अविश्वासाचे वातावरण तयार करण्याची शक्यता

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 24 एप्रिल 2021

परिस्थिती बिकट असली तरी समाजाची शक्ती कमी नसते.

दिल्ली  ः कोविड महामारीचे गंभीर संकट देशासमारे पुन्हा उभे ठाकले आहे. या गंभीर परिस्थितीचा लाभ उठवत समाजविघातक तसेच भारतविरोधी शक्तींच्या माध्यमातून देशात नकारात्मकता आणि अविश्वासाचे वातावरण तयार केली जाण्याची शक्यता आहे. देशवासियांना सकारात्मक प्रयत्न करत असतानाच या शक्तींच्या षडयंत्राच्या विरोधात सजग राहावे लागेल, असे व्यक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केले. 

कोविड महामारीची सांसर्गिकता आणि भीषणता या वेळी अधिक गंभीर आहे. तिचा क्रूर मारा आज देशाच्या अधिकांश भागाला सोसावा लागत आहे. संसर्गामुळे बहुसंख्य व्यक्ती रुग्णालयात दाखल होत आहेत. शेकडो कुटुंबांनी आपल्या प्रियजनांनाही गमावले आहे. या संकटाने त्रस्त असणाऱ्या देशवासियांप्रती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या संवेदना व्यक्त करीत आहे, असेही होसबळे यांनी म्हटले आहे. 

परिस्थिती बिकट असली तरी समाजाची शक्ती कमी नसते. संकटांशी झगडण्याची आपली क्षमता जगाला माहिती आहे. धैर्य आणि मनोबल कायम ठेवून संयम, शिस्त आणि परस्पर सहयोगाने आपण या परिस्थितीवर नक्की मात करू, यावर आमचा विश्वास आहे. 

महामारीच्या वाढत्या संसर्गामुळे रुग्णालयांत बेड, ऑक्सिजन तसेच औषधे अशा आवश्यक संसाधनांची कमतरता भासत आहे. यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. भारतासारख्या विशाल देशात समस्याही व्यापक रूप धारण करते. केंद्र व राज्य सरकार तसेच प्रशासन, स्थानिक संस्थांच्या माध्यमातून समस्या सोडविण्याचे प्रयत्न होत आहेत.

वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित सर्व बंधू-भगिनी, संरक्षण तसेच स्वच्छता कर्मचारी मागच्या वेळेप्रमाणेच आपला जीव धोक्यात घालून आपली जबाबदारी पूर्ण करीत आहेत. समाजाची गरज ओळखून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते नेहमीप्रमाणे देशभरात विभिन्न प्रकारच्या सेवाकार्यात सक्रिय आहेत. अनेक धार्मिक-सामाजिक संस्थांसोबत सामान्य समाजही स्वयंप्रेरणेने आव्हानाचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रयत्नांत सहभागी झाला आहे. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वयंसेवकांसह समाजाच्या सर्व सामाजिक आणि धार्मिक संघटना, सेवाभावी संस्था, उद्योग तसेच व्यावसायिक संस्था आदी क्षेत्रांतील नागरिकांना विनंती करत आहे की समस्येचे निराकरण करण्यासाठी तत्परता आणि सेवाभावाने कोणत्याही स्वरुपाच्या आवश्यकतेची पूर्तता करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करावेत, असेही त्यांनी म्हटले आहे. 

या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे 
 
►आरोग्य तसेच शिस्तीसंबंधी सर्व नियमांचे सर्वांनी पालन करावे. सेवा करणाऱ्या व्यक्तींनी स्वतःलाही सुरक्षित ठेवावे.
►मास्क वापरणे, स्वच्छता, शारिरीक अंतर, खासगी तसेच सार्वजनिक कार्यक्रमात संख्येच्या मर्यादेचे पालन अशा नियम व शिस्तीसंबंधात तसेच आयुर्वेदिक काढा सेवन, वाफ घेणे, लसीकरण अशा आरोग्य विषयक विषयांबाबत जनजागृती करावी
►अत्यावश्यक असल्यासच घराबाहेर पडावे. स्थानिक पातळीवर स्वतः सामूहिक निर्णयाद्वारे दैनंदिन कार्य नियंत्रित करावे
►सर्व स्तरांवर शासन-प्रशासन, डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, संरक्षण तसेच स्वच्छता कर्मचारी यांना सहकार्य करावे. 
►प्रसारमाध्यमांसह समाजाच्या सर्व वर्गांनी समाजात सकारात्मकता, आशा आणि विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यात योगदान द्यावे
►सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या व्यक्तींनी विशेष संयम आणि सजगतेने सकारात्मक भूमिका बजावावी.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख