नाना पटोले यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली 'ही' मागणी - Nana Patole Wants Parliamentary Training Institute in Nagpur | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात उमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात पोचणार

नाना पटोले यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली 'ही' मागणी

सरकारनामा ब्युरो
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

देशातील लोकप्रतीनिधींच्या प्रशिक्षणासाठी स्थापन झालेल्या संसदीय अभ्यास व प्रशिक्षण संस्थेचे (बीपीएसटी किंवा प्राईड) केंद्र नागपूरलाही स्थापन करावे अशी मागणी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

नवी दिल्ली :  देशातील लोकप्रतीनिधींच्या प्रशिक्षणासाठी स्थापन झालेल्या संसदीय अभ्यास व प्रशिक्षण संस्थेचे (बीपीएसटी किंवा प्राईड) केंद्र नागपूरलाही स्थापन करावे अशी मागणी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. काल दिल्लीत आलेले पटोले यांनी याबाबत लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून त्यांच्याशी त्यांनी या मुद्यावर चर्चाही केली आहे. नागपूर हे देशातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने लोकप्रतीनिधींचे प्रशिक्षण वर्ग तेथे घेणे सोयीस्कर होईल असेही पटोले यांनी म्हटले आहे.

गुजरातमधील केवडिया येथे बीपीएसटीतर्फे येत्या २५ व २६ नोव्हेंबरला देशातील विधीमंडळांच्या पीठासीन अधिकाऱ्यांची वार्षिक परिषद होणार आहे. यंदाचा राज्यघटनादिन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरात साजरा करण्याची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे. त्यांच्यासह राज्यसभाध्यक्ष वेंकय्या नायडू हेही या परिषदेला संबोधित करतील. अहमदाबादचे खासदार व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा परिषदेचे यजमान असतील. 'कार्यपालिका, न्यायपालिका व विधायिका या लोकशाहीच्या तिन्ही स्तंभांमध्ये संतुलन-संवाद-समन्वय असणे हे लोकशाहीच्या यशासाठी आवश्‍यक आहे,' ही यंदाच्या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे. नागपूरला बीपीएसटीचे केंद्र स्थापन करण्याच्या मुद्यावर त्या परिषदेतही चर्चा व्हावी अशीही इच्छा पटोले यांनी व्यक्त केली आहे.

बीपीएसटी ही संसदीय कार्यप्रणालीतील अत्यंत महत्वाची संस्था आहे. देशाची संसदीय प्रणाली, नियमावली, राज्यघटनेची तत्वे आदींबाबत तेथे राज्यांच्या लोकप्रतीनिधींचे प्रशिक्षण वर्ग सुरू असतात. लोकप्रतीनिधींना व विधिमंडळ अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम येथे राबविला जातो. त्यासाठी संसदीय विषयातील तज्ज्ञ संस्थेकडे आहेत. सध्या याचे मुख्यालय संसद भवनासमोरील ग्रंथालय इमारतीत आहे.

नागपूर हे देशातील मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे विधीमंडळ, सचिवालय व इतर सुसज्ज सुविधा आहेत. मात्र सध्या हिवाळी अधिवेशनाचा सुमारे महिनाभराचा कालावधी वगळता येथे फारसे उपक्रम होत नाहीत. बीपीएसटीचे केंद्र नागपूरला झाले तर या सर्व सेटअपचा वापर वर्षभर केला जाऊ शकतो. नागपूर हे देशाच्या मध्यभागी असल्याने कोणत्याही राज्यातील लोकप्रतीनिधी किंवा अधिकाऱ्यांना येथे येणे तुलनेने सोपे पडेल असेही त्यांनी नमूद केले.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख