पोलिस आयुक्तांनी धाडस दाखवले : मराठी भाषिकांना मारहाण करणारे तीन पोलिस निलंबित 

आजपर्यंत एकाही पोलिसावर कारवाई झालेली नव्हती.
Three policemen of Belgaum police station suspended for beating Marathi speakers
Three policemen of Belgaum police station suspended for beating Marathi speakers

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण केल्याचा ठपका ठेवून बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यातील तिघा पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याने संपूर्ण पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. मराठी भाषिकांवर पोलिसांनी यापूर्वी अनेक वेळा अन्याय-अत्याचार केले आहेत. मात्र, आजपर्यंत एकाही पोलिसावर कारवाई झालेली नव्हती. पोलिस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी या प्रकरणाची प्रथमच गांभीर्याने दखल घेत निलंबनाची कारवाई केल्याने त्यांचा हा निर्णय धाडसी म्हणावा लागेल. (Three policemen of Belgaum police station suspended for beating Marathi speakers)

बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यातील गोविंद पुजारी, नारायण चिप्पलकट्टी आणि चन्नाप्पा हुनशाळ अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्यावर  बेळगावचे पोलिस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी ही कारवाई केली आहे.

सीमा भागातील मराठी भाषिकांना कर्नाटक पोलिसांकडून या ना त्या कारणावरून कायम त्रास दिला जातो. खोटेनाटे गुन्हे दाखल केले जातात. तसेच, अमानुष मारहाण करण्याचे प्रकार काही नवीन नाहीत. यापूर्वी येळ्ळूर येथील महाराष्ट्र राज्य फलक काढल्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांना अक्षरशा बदडून काढले होते. यामध्ये अनेकजण जायबंदीही झाले होते. त्यामुळे या प्रकरणाची दाद मागण्यासाठी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करण्यात आली. तसेच, त्याबाबतचा खटलाही न्यायालयात सुरू आहे. याव्यतिरिक्त यापूर्वी अनेक प्रकरणात मराठी भाषिकांना पोलिसांनी मारहाण केली आहे. पण, आजपर्यंत एकाही प्रकरणात पोलिसावर कारवाई झालेली नव्हती. मात्र, ते धाडस पोलिस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी दाखवले आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यानंतर मच्छे येथील तिघा तरुणांना ग्रामीण पोलिसांनी अमानुष मारहाण केली होती. याबाबत प्रसारमाध्यमातून सविस्तर वृत्त प्रसिद्ध होताच पोलिस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी या प्रकाराची चौकशी करून अहवाल देण्याची सूचना केली होती. त्यानुसार ग्रामीणचे सहायक पोलिस आयुक्त जी. वाय. गुडाजी यांनी या मारहाण प्रकरणाची चौकशी करून दोषी असणाऱ्या पोलिसांचा सविस्तर अहवाल पोलिस आयुक्तांकडे सादर केला होता. त्यानुसार घटना घडून तब्बल चार महिने झाल्यानंतर संबंधित पोलिसांवर निलंबनाची कारवाई करणयात आली आहे. मात्र, उशिरा का होईना पोलिस आयुक्तांनी घेतलेल्या धाडसी निर्णयाबद्दल मराठी भाषिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

काय आहे प्रकरण?

शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या वाहनावर कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. त्यावेळी वाहनासमोरील नामफलकाची मोडतोड करून काळे फासले होते. या हल्ल्याचे तीव्र पडसाद सीमाभागासह संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते. त्यामुळे मराठी भाषिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनेचा निषेध व्यक्त केला. १३ मार्च रोजी मछे येथील तिघा तरूणांनी काही मजकूर सोशल मीडियावर व्हायरल केला होता. तो मजकूर भाषिक तेढ निर्माण करणारा असल्याचा आरोप होता. 

बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक आनंद आदगोंड यांनी तिघा सहकाऱ्यांना सोबत घेऊन विशाल छप्रे, दिगंबर देळेकर आणि निखिल केसरकर या तीन तरुणांना पोलिस ठाण्यात आणले होते. त्यांना पोलिसांनी बेल्ट व काठीने अमानुष मारहाण केली होती. त्यामुळे तरुणांच्या पाठीवर, पायावर, हातावर, चेहऱ्यावर काळे-निळे व्रण उठले होते. हाता पायांना सूज आल्याने त्यांना चालता येणेही कठीण बनले होते. 

ही माहिती समजताच समितीच्या नेत्यांनी पोलिस ठाण्याकडे धाव घेऊन कार्यकर्त्यांची सुटका केली होती. त्यानंतर पोलिसांच्या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेत या प्रकाराची चौकशी लावली होती. पोलिस ठाण्यातील त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी तरुणांना केलेल्या मारहाणीचे दृश्य स्पष्ट दिसून आले. त्यामुळे पोलिस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी तीन पोलिसांना निलंबित केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com