महाराष्ट्र एकीकरण समितीविरोधात प्रचार करत फडणवीसांनी स्वतःला महाराष्ट्रद्रोही सिद्ध केलंय

त्यामुळे आम्हाला अपेक्षित होतं की कोणी येणार नाही.
Maharashtra Unification Committee candidate Shubham Shelke criticizes Devendra Fadnavis
Maharashtra Unification Committee candidate Shubham Shelke criticizes Devendra Fadnavis

बेळगाव : ‘‘आम्हाला अपेक्षित होते, महाराष्ट्रातून तरी कुठल्या पक्षाचे नेते महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचार करण्यासाठी येणार नाहीत. कारण, हा सीमावादाचा प्रश्न आहे. तो महाराष्ट्र आणि कर्नाटकचा असून तो बेळगाव आणि कर्नाटकचा नाही. त्यामुळे आम्हाला अपेक्षित होतं की कोणी येणार नाही. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस येथे येऊन आमच्या विरोधात प्रचार करत स्वतःला महाराष्ट्रद्रोही सिद्ध केलेलं आहे,’’ असा टोला महराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव पोटनिवडणुकीतील उमेदवार शुभम शेळके यांनी लगावला.

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. खासदार संजय राऊत आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी येथे येऊन तुम्हाला पाठिंबा देत तुमचा प्रचार केला. मात्र, देवेंद्र फडणवीस हे मात्र भाजपच्या प्रचारासाठी आले होते. या प्रश्नावर उत्तर देताना शेळके यांनी फडणवीस यांना वरील टोला लगावला. 

शेळके म्हणाले की, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे सुरुवातीपासूनच सीमाप्रश्न सोडविण्यासाठी आग्रही आहेत. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाला मात्र या प्रश्नाशी काही सोयरसुतक आहे, असे वाटत नाही. हा प्रश्न निर्माण केला, त्यावेळच्या काँग्रेसने आणि भाजपला हा प्रश्न सोडवायचा नाही. ज्यावेळी देवेंद्र फडणवीस हे सत्तेत (मुख्यमंत्री) होते, त्यावेळी त्यांची भेट घेण्यासाठी आम्हाला साडेचार वर्षे वाट बघावी लागली होती. साडेचार वर्षांनंतर आम्ही आझाद मैदान उपोषण केले, त्यावेळी आम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट मिळाली होती, त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला जास्त अपेक्षा नव्हती आणि येथे येऊन ते आमच्या अपेक्षेवर खरे उतरले आहेत, असे आम्हाला वाटते.

लोकशाही दिलेल्या अधिकारानुसार मी नवमतदार म्हणून नव्या क्रमांकाला मतदान केले आहे. मराठी माणसाने ठरवले की आपल्याच माणसाला (महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारास) मतदान करायचे, तर विजय दूर नाही. आम्ही प्रचाराला सुरुवात केल्यापासून जे वातावरण बेळगावत तयार झाले, तसे वातावरण मी प्रथमच पाहत आहे. मला जसं समजतं, तेव्हापासून मी या लढ्याशी जोडला गेलो आहे. पण, एखाद्या निवडणुकीत एवढा उत्साह पहिल्यांदाच बघायला मिळत आहे. आमच्या प्रचारात सुमारे ७० टक्के तरुणवर्ग सहभागी होता, त्यामुळे नागरिकांचाही मोठा प्रतिसाद आम्हाला मिळाला, असेही शुभम शेळके यांनी सांगितले.

ते म्हणाले की, आमचं अंतिम ध्येय हे संयुक्त महाराष्ट्रात सामील होणे, हेच आहे. कर्नाटकात मराठी माणसाची गळचेपी होते आहे, शिवरायांचा अपमान होत आहे. शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या भगव्या झेंड्याची विटंबना केली जाते, ह्याबाबतची चीड व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून ही निवडणूक आहे. शिवाय, मराठी माणसाला त्रास देणाऱ्या कन्नडगी संघटनांचा वचपा काढण्याची एक संधी म्हणून मराठी माणूस या निवडणुकीकडे पाहत आहे.

जोपर्यंत आमचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत सीमावासियांवरील अन्याय थांबवणे, हा आमचा मूळ उद्देश आहे. प्रश्न सोडविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणे आणि बेळगावच्या सर्वांगीण विकासासाठी परिश्रम मी घेणार आहे, हे काम मी विजयी झाल्यानंतर प्रथम करणार आहे, असेही शेळके यांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com