महाराष्ट्रातील नेत्यांच्या वक्तव्यांवर निर्बंध आणण्याची कर्नाटकच्या नेत्याची मागणी - Karnataka Leader wants restrictions on Maharashtra Leaders Speeches | Politics Marathi News - Sarkarnama

महाराष्ट्रातील नेत्यांच्या वक्तव्यांवर निर्बंध आणण्याची कर्नाटकच्या नेत्याची मागणी

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंसह महाराष्ट्रातील नेत्यांनी सीमाप्रश्‍नी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे कर्नाटकातील सर्वपक्षीय नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यातून गेले काही दिवस त्यांच्याकडून बेताल वक्तव्ये केली जात आहेत. आता त्यात कॉंग्रेसचे माजी मंत्री एच. के. पाटील यांची भर पडली आहे.

बेळगाव : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंसह महाराष्ट्रातील नेत्यांनी सीमाप्रश्‍नी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे कर्नाटकातील सर्वपक्षीय नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यातून गेले काही दिवस त्यांच्याकडून बेताल वक्तव्ये केली जात आहेत. आता त्यात कॉंग्रेसचे माजी मंत्री एच. के. पाटील यांची भर पडली आहे.

सीमाप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयात दाखल दाव्यात अंतरीम अर्ज दाखल करुन महाराष्ट्र नेत्यांनी कन्नड भाषा व कर्नाटक विरोधात कोणत्याही स्वरुपाचे भाष्य करु नये. यासाठी निर्बंध प्रतिज्ञापत्र सादर करण्याची अजब मागणी केली आहे.

सीमाप्रश्‍नाचे सल्लागार अॅड. रविंद्र तोटीगार यांनी माजी मंत्री पाटील यांची नुकतीच बंगळूरला भेट घेऊन सीमाप्रश्‍नावर चर्चा केली. सीमाप्रश्‍नाचा दावा सर्वोच्च न्यायालयात आहे. दाव्यात अंतरीम अर्ज दाखल करुन कन्नड भाषा व कर्नाटकाबाबत कोणतेही वक्तव्य महाराष्ट्रातील नेत्यांनी करु नये, या आशयाचा अर्ज दाखल केला जावा. निर्बंध प्रतिज्ञापत्र सादर केले जावे, असे श्री. पाटील यांनी राज्य सरकारला सुचविले आहे. सिध्दरामय्या राज्याचे मुख्यमंत्री असताना श्री. पाटील ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री तसेच कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्‍न समन्वय मंत्री होते.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या नेत्यांनी सीमाप्रश्‍नी रोखठोक भूमिका घेण्यास सुरवात केली आहे. कर्नाटकला जशास तसे उत्तर मिळत आहे. त्यामुळे, कर्नाटकी नेत्यांना मिरच्या झोंबण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे, त्यांच्याकडून बिनबुडाची वक्‍तव्ये केली जात आहे. बिथरलेल्या कर्नाटकी नेत्यांकडून चक्क मुंबईवर दावा सांगितला जात आहे. तर सीमाप्रश्‍न संपलेला अध्याय असल्याचे तुणतुणे वाजविले जात आहे. त्यात आता श्री. पाटील यांनी महाराष्ट्रातील नेत्यांच्या बोलण्यावर निर्बंध घालण्याची हास्यास्पद मागणी केली आहे.
Edited By - Amit Golwalkar

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख