मराठीबाबत मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी दाखविले खरे दात - Karnataka CM Yediyurappa express hatred about Marathi Again | Politics Marathi News - Sarkarnama

मराठीबाबत मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी दाखविले खरे दात

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

मराठा विकास प्राधिकरण स्थापन करण्याच्या निर्णयाचा मराठी भाषेशी काही संबंध नससल्याचे सांगून मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी आपले खरे दात दाखवून दिले आहेत. या संबंधात ट्वीट करून मराठीची काविळ झालेल्या कन्नड संघटनांना गोंजारण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.

बंगळूर  : मराठा विकास प्राधिकरण स्थापन करण्याच्या निर्णयाचा मराठी भाषेशी काही संबंध नससल्याचे सांगून मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी आपले खरे दात दाखवून दिले आहेत. या संबंधात ट्वीट करून मराठीची काविळ झालेल्या कन्नड संघटनांना गोंजारण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.

बेळगाव लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मराठा समजाला खूष करण्यासाठी मराठा विकास प्राधिकरणाची स्थापना करण्याची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती. त्याबरोबर मराठीविरुध्द सातत्याने गरळ ओकणाऱ्या काही कन्नड संघटनांनी गदारोळ घालण्यास सुरवात केली. सतत वटवट करणाऱ्या वाटाळ नागराजने तर या हा निर्णय मागे घेण्यासाठी कर्नाटक बंदची गर्जना केली आहे. या तथाकथित कन्नड संघटनांना शांत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजासाठी प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आहे, त्याचा मराठी भाषेशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण केले आहे.

मराठा विकास प्राधिकरणाचा हेतू राज्यातील मराठा समाजाचा विकास हा आहे. प्राधिकरणाचा मराठी भाषेशी काहीही संबंध नाही, असे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. ''मराठा समाजातील लोक अनेक पिढ्यांपासून कर्नाटकात राहत आहेत. प्राधिकरणाचे लक्ष्य त्यांच्या आर्थिक, सामाजिक आणि व्यापक विकासाचे आहे,'' असे येडियुरप्पा यांनी नमूद केले आहे.

मराठा विकास प्राधिकरण स्थापन करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात कन्नड संघटनांनी आकांड-तांडव केल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासमोर नमते घेतले आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या या दुटप्पी धोरणाबद्दल मराठी भाषिकात नाराजी पसरली आहे. कर्नाटकात मराठी भाषेची कशी गळचेपी केली जात आहे, त्याचे हे एक उदाहरण आहे. केवळ राजकीय स्वार्थ साधण्यासाठी मराठा समाजाचा वापर केला जात आहे, हे यावरून स्पष्ट होते. यासाठी मराठी भाषिकांनी सावध होणे आवश्‍यक आहे. विकासाच्या थापावर विश्वास ठेऊन राजकीय पक्षांच्या दावणीला स्वत:ला बांधून घेणे म्हणजे आत्मघात आहे, अशा प्रतिक्रीया मराठी भाषिकांत उमटत आहेत.
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख