मराठा समाजाला मुख्यमंत्र्यांची दिवाळी भेट : मराठा विकास प्राधिकरणास 50 कोटींचे अनुदान  - CM's Diwali visit to Maratha community: Rs 50 crore grant to Maratha Development Authority | Politics Marathi News - Sarkarnama

मराठा समाजाला मुख्यमंत्र्यांची दिवाळी भेट : मराठा विकास प्राधिकरणास 50 कोटींचे अनुदान 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

भारतीय जनता पक्षाला नेहमीच मराठा समाजाचा पाठिंबा मिळत आला आहे.

बेळगाव : कर्नाटकातील मराठा समाजाला मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा सरकारने दिवाळीची भेट दिली आहे. राज्यात "मराठा विकास प्राधिकरण' स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. यासाठी 50 कोटी रुपये अनुदान राखीव ठेवले जाणार आहे. 

कर्नाटक राज्यात मराठा समाज मोठ्या संख्येने आहे. बेळगावसह उत्तर कर्नाटक आणि दक्षिण कर्नाटकातही मराठा समाज असून भारतीय जनता पक्षाला नेहमीच मराठा समाजाचा पाठिंबा मिळत आला आहे. त्यामुळे नेहमीच मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मराठा समाजाच्या विकासावर भर दिला आहे. मराठा समाजाला खूश करण्यासाठी या पूर्वीही राज्यात शासकीय पातळीवर शिवजयंती साजरी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी घेतला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी मराठा समाजाच्या विकासासाठी प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेत समाजाला आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला आहे. 

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी, इतर मागास खात्याला टिप्पणी पाठविली असून या टिप्पणीत मराठा समाज विकास प्राधिकरण स्थापन करण्याचे सांगितले आहे. महसूल खात्याच्या संमतीसह प्राधिकरणसाठी 50 कोटी रुपये राखीव ठेवण्याची सूचना यात केली आहे. हे अनुदान मराठा समाजाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक विकासासाठी वापरले जाणारे आहे. 

मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी बेळगावातील सांबरा येथे शिवपुतळा अनावरण कार्यक्रमात राज्यात शिवजयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार त्यांनी राज्यात ती सुरुही केली. राज्याच्या अर्थसंकल्पात यापूर्वी त्यांनी 5 कोटी रुपये अनुदानही जाहीर केले होते. मात्र त्याचा फायदा दक्षिण कर्नाटकपुरता मर्यादित राहिला होता. 

बेळगाव पोटनिवडणुकीसाठी डावपेच 

बेळगावसह उत्तर कर्नाटकात मराठा समाजाची संख्या मोठी आहे. त्यातच उत्तर कर्नाटकात नेहमीच भाजपचे पारडे जड राहिले आहे. त्यामुळे येडियुराप्पांनी या घटकावर लक्ष दिले आहे. बेळगाव लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी जर सुरेश अंगडी यांच्या कुटुंबातील सदस्यांनी उमेदवारी घेतली नाही अथवा श्रेष्ठींनी दुसऱ्या उमेदवाराचा विचार केल्यास निर्णायक मराठा समाजाची मते पक्षाकडे वळविण्याचाही हेतू असणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख