'राजद'चा नवा फंडा; आमदारांना दरमहा १० हजार रुपयांची सक्ती - RJD Asked MLA's To donate to Party Fund Every Month | Politics Marathi News - Sarkarnama

'राजद'चा नवा फंडा; आमदारांना दरमहा १० हजार रुपयांची सक्ती

वृत्तसंस्था
रविवार, 20 डिसेंबर 2020

लालूप्रसाद यादव तुरुंगात असल्याने या निवडणुकीची धुरा तेजस्वी यादव यांच्याकडे होती. त्यांनी धडाक्याने प्रचार करत पक्षाला चांगल्या जागा मिळवून दिल्या. परंतु, त्यांना सत्ता स्थापन करता आली नाही. आता पुढील काळात पक्षसंघटना बळकट करण्याचे तेजस्वी यादव यांनी ठरवले असून त्यासाठी आमदारांना निधी मागितला जात आहे.

पाटणा : बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाने (RJD) एक नवा फंडा काढला आहे. आपल्या सर्व आमदारांनी दरमहा दहा हजार रुपये पक्षनिधीसाठी द्यावेत, असा फतवा पक्षाचे नेते तेजस्वी यादव यांनी काढला आहे. यावरुन पक्षाच्या आमदारांमध्ये नाराजी आहे. माजी आमदारांनाही पक्षनिधीत हातभार लावावा लागणार आहेत

बिहारमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर एनडीएने सत्ता स्थापन केली. हा राष्ट्रीय जनता दलाला हा धक्का होता. लालूप्रसाद यादव तुरुंगात असल्याने या निवडणुकीची धुरा तेजस्वी यादव यांच्याकडे होती. त्यांनी धडाक्याने प्रचार करत पक्षाला चांगल्या जागा मिळवून दिल्या. परंतु, त्यांना सत्ता स्थापन करता आली नाही. आता पुढील काळात पक्षसंघटना बळकट करण्याचे तेजस्वी यादव यांनी ठरवले असून त्यासाठी आमदारांना निधी मागितला जात आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 'राजद'ने एक आदेश जारी केला असून आपले ७५ आमदार व १० विधानपरिषद सदस्य यांना दरमहा दहा हजार रुपये पक्षनिधीसाठी देण्यास सांगितले आहे. काही आमदारांनी हा निधी जमाही केला आहे. या आधी प्रत्येक आमदाराने प्रत्येकी २५ हजार रुपये दरमहा द्यावेत, असा आदेश देण्यात आला होता. परंतु, त्यावरून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली गेली. त्यामुळे ही रक्कम दहा हजार रुपयांपर्यंत घटवण्यात आली आहे. माजी आमदारांनाही दरमहा प्रत्येकी चार हजार रुपये पक्षनिधीसाठी देण्यास सांगण्यात आले आहे. 

दरम्यान, जनदा दल (संयुक्त)ने 'राजद'च्या आदेशावर कडाडून टीका केली आहे. ''आधी उमेदवारी मिळवण्यासाठी पैसे, निवडून आल्यानंतर मग कमिशन, हरलात तर निवृत्तीवेतनातून कमिशन. तुम्ही नक्की किती खाणार आहात? भूकेलाही मर्यादा असते. यांनी तर लालूप्रसाद यांनाही पार मागे टाकले,'' अशी टीका JDU चे प्रवक्ते अजय अलोक यांनी केली आहे.
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख