आयव्हरमेक्टिन वापरताय? मग जागतिक आरोग्य संघटनेचा हा इशारा वाचा!

औषधाचा अतिरेकी वापर थांबविण्याच्या सूचना
ivermectine
ivermectine

नवी दिल्ली :  गोवा सरकारने कोरोनावरील आयव्हरमेक्टिन या औषधाच्या वापराला परवानगी दिल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांच्या भुवया उंचावल्या होत्या. (Goa govt allows ivermectin for corona patients)  जागतिक आरोग्य संघटनेने मात्र या औषधाच्या वापरावरून खबरदारीचा इशारा दिला आहे. (WHO warns on use ivermectin medicine)

एखाद्या औषधाचा वापर केला जात असताना त्याची सुरक्षितता आणि परिणामकारकता या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. हे औषध फक्त क्लिनिकल ट्रायल्समध्ये वापरले जायला हवे, या औषधाचा सरसकट वापर केला जाऊ नये, असे आरोग्य संघटनेच्या मुख्य संशोधक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे आयव्हरमेक्टिनची उत्पादक कंपनी असणाऱ्या एमएसडीने देखील काहीसा अशाच प्रकारचा इशारा दिला आहे. या औषधाच्या वापरानंतर आमच्या हाती येत असलेल्या सर्व निष्कर्षांचा आम्ही काळजीपूर्वक अभ्यास करत आहोत, असे उत्पादक कंपनीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

ठोस पुरावे नाहीच
मागील दोन महिन्यांमध्ये आरोग्य संघटनेने सलग दुसऱ्यांदा या औषधाच्या वापराबाबत इशारा दिला आहे. या औषधाच्या सेवनामुळे मृत्यूदर कमी होतो किंवा रुग्णांचे रुग्णालयांत दाखल होण्याचे प्रमाण देखील कमी होते हे दर्शविणारे फार कमी पुरावे हाती आल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

हे पण वाचा : बारा वर्षांच्या मुलांनाही मिळणार लस

वॉशिंग्टन : अमेरिकेने लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढविली असून आता १२ वर्षांपुढील सर्वांना फायझर कंपनीने विकसीत केलेली लस दिली जाणार आहे. शाळा सुरु होण्याआधी सर्व विद्यार्थ्यांना लस देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या नव्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला गुरुवारपासून (ता. १३) सुरुवात होणार आहे.
जनजीवन सुरळीत करण्यासाठी अमेरिका सरकार वेगाने उपाय योजना राबवित आहे. लस सल्लागार समितीने १२ ते १५ वयोगटातील किशोरवयीन मुला-मुलींना लस देण्यास हरकत नसल्याचे सांगितल्यानंतर तातडीने लसीकरण मोहिम आखण्यात आली. विविध कंपन्यांच्या लशी केवळ १८ वर्षांवरील व्यक्तींनाच दिल्या जात आहेत. फायझरची लस मात्र १६ वर्षांच्या मुलांनाही दिली जात आहे. आता हा वयोगट आणखी कमी करण्यात आला आहे.

युवतीला दिले सहा डोस
रोम : इटलीमधील एका २३ वर्षांच्या युवतीला फायझर लशीचे सहा डोस दिले गेल्याची घटना उघडकीस आले आहे. एका रुग्णालयात लसीकरणासाठी ही युवती गेली असता तेथील लस देणाऱ्या नर्सने एका लशीच्या बाटलीतील सर्व औषध सीरिंजमध्ये भरले आणि सर्वच्या सर्व त्या युवतीच्या शरीरात टोचले. लस देऊन झाल्यावर तिच्या चूक लक्षात आली. वास्तविक एका बाटलीतून सहा जणांना डोस देता येतात. यानंतर लगेचच त्या युवतीला रुग्णालयात दाखल करून तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात आले. २४ तासांत काहीही त्रास न झाल्याने तिला घरी सोडून देण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com