'विक्रांत' समुद्री चाचण्यांसाठी सज्ज; कोचीन बंदरातील चाचण्या यशस्वी - New Vikrant Ready for Sea Trials | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार म्हणतात, "मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.."
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे

'विक्रांत' समुद्री चाचण्यांसाठी सज्ज; कोचीन बंदरातील चाचण्या यशस्वी

वृत्तसंस्था
बुधवार, 2 डिसेंबर 2020

अडीच हजार किलोमीटर लांबीच्या इलेक्‍ट्रिक केबल, दीडशे किलोमीटरचे पाईप असे साहित्य घेऊन समुद्रावर आरूढ होणारी भारताची विक्रांत ही पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका समुद्री चाचण्यांसाठी सज्ज झाली आहे

मुंबई : अडीच हजार किलोमीटर लांबीच्या इलेक्‍ट्रिक केबल, दीडशे किलोमीटरचे पाईप असे साहित्य घेऊन समुद्रावर आरूढ होणारी भारताची विक्रांत ही पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका समुद्री चाचण्यांसाठी सज्ज झाली आहे. कोचीन बंदरातील तिच्या चाचण्या कालच यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या असून, आता जानेवारीपासून केव्हाही तिच्या खुल्या समुद्रातील चाचण्या सुरू होतील.

'विक्रांत', 'विराट' या इंग्लिश बनावटीच्या विमानवाहू युद्धनौका निवृत्त झाल्यावर भारतीय नौदलाचा भार आता 'विक्रमादित्य' ही रशियन बनावटीची विमानवाहू युद्धनौका वाहत आहे. कोचीन नौदल गोदीत बनवली जात असलेली ही सुमारे चाळीस हजार टनी पहिलीवहिली स्वदेशी युद्धनौका आता विक्रमादित्यच्या जोडीला येत असून, ही भारतासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले जात आहे. आता निवृत्त झालेली पहिली इंग्लिश बनावटीची विमानवाहू युद्धनौका विक्रांतवरूनच हिचे नामकरण विक्रांत केले आहे. युद्धनौकेची बांधणी जवळपास पूर्ण झाली असून, कोचीन बंदरात तिच्या चाचण्या घेण्यात आल्या. युद्धनौकेचे इंजिन, वीजनिर्मिती आणि वितरण यंत्रणा व्यवस्थित काम करीत असल्याचेही कळून आले, असे नौदलाच्या प्रवक्‍त्याने सांगितले.

२० हजार कोटी खर्च
युद्धनौकेवरील ७५ टक्के उपकरणे व साहित्य स्वदेशी बनावटीचे असून, तिच्या बांधणीसाठी २३ हजार टन स्टील वापरले आहे. अडीच हजार किलोमीटरच्या इलेक्‍ट्रिक केबल, दीडशे किलोमीटर लांबीचे पाईप, दोन हजार व्हॉल्व्ह, नांगर, वातानुकूलन यंत्रणा, रेफ्रीजरेटर प्लांट, शुद्ध पाणी पुरविणारी यंत्रणा, स्वीचबोर्ड आदी बनविण्यात ५० भारतीय कंपन्यांचा हातभार लागला आहे. प्रत्यक्ष युद्धनौका तयार करण्यासाठी दोन हजार कर्मचारी झटत होते, तर या कामामुळे ४० हजार लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळाला. २० हजार कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आहे.

अशी आहे युद्धनौका
वजन- ४० हजार मेट्रिक टन
लांबी- २६२ मीटर किंवा ८६० फूट
स्की जंप (विमानोड्डाणासाठीची विशेष चढण)सह तीस विमाने हेलिकॉप्टरचा समावेश शक्‍य
मिग २९ विमाने व कामोव्ह किंवा सी-किंग हेलिकॉप्टर राहू शकतात
कामोव्ह हेलिकॉप्टर शत्रूच्या हवाई हल्ल्याची पूर्वसूचना देईल
सी-किंग हेलिकॉप्टर शत्रूच्या पाणबुड्यांना शोधून नष्ट करेल
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख