जेटलींच्या पुतळ्याच्या मुद्द्यावरुन बिशनसिंग बेदींची नाराजी

फिरोजशाह कोटला स्टेडियम परिसरात माजी अध्यक्ष अरूण जेटली यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास विरोध करताना माझे सदस्यत्त्व रद्द करा, स्टॅंडला दिलेले माझे नाव काढून टाका अशी आक्रमक भूमिका बिशनसिंग बेदी यांनी घेतली आहे
Bishansingh Bedi - Arun Jaitley
Bishansingh Bedi - Arun Jaitley

नवी दिल्ली :  दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेने फिरोजशाह कोटला स्टेडियम परिसरात माजी अध्यक्ष अरूण जेटली यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास विरोध करताना माझे सदस्यत्त्व रद्द करा, स्टॅंडला दिलेले माझे नाव काढून टाका अशी आक्रमक भूमिका बिशनसिंग बेदी यांनी घेतली आहे.

दिल्ली संघटना घराणेशाहीस प्रोत्साहन देत आहे तसेच प्रशासकांना क्रिकेटपटूंपेक्षा जास्त महत्त्व देत असल्याचा आरोप बेदी यांनी केला. त्यांनी दिल्ली संघटनेचे अध्यक्ष रोहन जेटली यांना लिहिलेल्या पत्रात अरुण जेटली यांच्यावर टीका केली आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या जेटली यांचे गतवर्षी निधन झाले.

मी खूप संयम बाळगतो, पण आता तो संपत चालला आहे. दिल्ली संघटनेने माझ्या सहनशक्तीचा अंत पाहिला आहे. त्यामुळे स्टॅंडवरुन तुम्ही माझे नाव काढणे, माझे सदस्यत्त्व रद्द करणेच योग्य होईल, असे बेदी यांनी पत्रात म्हंटले आहे. अरुण जेटली १४ वर्षे दिल्ली संघटनेचे अध्यक्ष होते. त्यांचा सहा फूट पुतळा कोटला स्टेडियम परिसरात उभारण्याचा दिल्ली संघटनेचा मानस आहे. संघटनेने २०१७ मध्ये प्रत्येकी एका स्टॅंडला बिशनसिंग बेदी आणि मोहींदर अमरनाथ यांचे नाव दिले.

स्टॅंडला नाव दिलेत त्यावेळी माझा सन्मान झाला. सन्मान होतो, त्यावेळी जबाबदारीही येते. अरुण जेटली यांनी दिल्ली संघटनेचा कारभार पाहण्यासाठी निवडलेल्या व्यक्ती चुकीच्या होत्या. एका बैठकीच्यावेळी एका सदस्यांने खूपच आक्षेपार्ह भाषा वापरली होती. ही बैठक जेटली यांच्या घरात होती, तरीही त्यांनी त्याला बैठकीतून बाहेर काढले नाही. जेटली यांच्या खुशमस्करांच्या भ्रष्ट दरबारात मी आक्रमक होतो, असे बेदी म्हणाले.

सध्याचे नेतृत्त्वही हुजऱ्यांचा मुजरा स्वीकारणारे आहे. कोटला स्टेडियमचे नाव बदलून ते अरुण जेटली स्टेडियम करण्याचा निर्णय मला पसंत नव्हता. मात्र आता तरी काही सूज्ञ निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा होती. पण मी चूकीचा होतो. जेटली यांचा पुतळा उभारणे मला मान्य नाही. अपयश कोणी पुतळे उभारुन साजरे करीत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

बेदींचे ताशेरे
- क्रीडांगण परिसरात खेळाडूंचाच सन्मान हवा
- प्रशासकांनी त्यांच्या काचेच्या केबिनमध्ये असावे
- क्रिकेट संस्कृतीच दिल्ली संघटनेस कळत नाही
- कशाला महत्त्व द्यायचे कळत नाही, त्या स्टेडियममध्ये माझे नाव नको
Edited By - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com