नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे सामान्य जनता त्रस्त आहे. विरोधकही यावरुन सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. याच पार्श्वभूमीवर खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे. सीतेच्या नेपाळमध्ये आणि रावणाच्या लंकेत श्रीरामाच्या भारतापेक्षा पेट्रोल स्वस्त असल्याचे ट्वीट करत स्वामी यांनी सरकारला चिमटा काढला आहे.
— Subramanian Swamy (@Swamy39) February 2, 2021
केंद्र सरकारने काल सादर केलेल्या अर्थसंकल्पात पेट्रोलवर अडीच रुपयांचा आणि डिझेलवर चार रुपयांचा शेती उपकर लावला. इंधनाचे दर कमी होतील, ही मध्यमवर्गीयांची अपेक्षा फोल ठरली आहे. इंधनावरील अबकारी करात सातत्याने वाढ होत असल्याने त्यात दिलासा मिळण्याची अपेक्षा होती. साऱ्या आशिया खंडात इंधनाचे दर भारतात सर्वाधिक आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड आॅइलचे दर हे साठ रुपये प्रति बॅरल असताना भारतात मात्र ते तढे आहेत. अबकारी कराच्या रकमेतून सरकार वर्षाला सुमारे दीड ते दोन लाख कोटी रुपये वसूल करत आहे. इंधनाचे दर हे अर्थसंकल्पानंतर उतरणार असल्याची अपेक्षा फोल ठरली.
आता विरोधकांबरोबरच खासदार डाॅ. सुब्रमण्यम स्वामीही सरकारवर टीका करायला उतरले आहे. नेपाळ ही सीतेची जन्मभूमी मानली जाते. तर लंका ही रावणाची हे सर्वश्रुत आहे. या दोन्ही देशांमध्ये पेट्रोलचे दर भारतापेक्षा निम्म्याने कमी असल्याचे स्वामी यांनी दाखवून दिले आहे. सीतेच्या नेपाळमध्ये पेट्रोल ५३ रुपये प्रतीलिटर, रावणाच्या लंकेत ५१ रुपये प्रतीलिटर तर रामाच्या भारतात ते ९३ रुपये कमी आहे, असे मनोरंजक पण चिमटा घेणारे ट्वीट स्वामी यांनी केले आहे.
Edited By - Amit Golwalkar

