फडणवीसांच्या मर्जीतील हर्डीकर गेले अन्‌ ठाकरेंच्या विश्वासातील पाटील आले 

निवडणुकीच्या तोंडावर फडणवीस समर्थक हर्डीकरांची बदली करण्यात येऊन तेथे ठाकरे आणि पवारांच्या मर्जीतील पाटील यांना आणण्यात आले आहे.
Transfer of Pimpri Chinchwad Commissioner Shravan Hardikar
Transfer of Pimpri Chinchwad Commissioner Shravan Hardikar

पिंपरी : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरहून पिंपरी-चिंचवडला महापालिका आयुक्त म्हणून आणलेले आपल्या मर्जीतील सनदी अधिकारी श्रावण हर्डीकर यांची आज (ता. 12 फेब्रुवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बदली केली.

आतापर्यंतच्या पालिका आयुक्तांत ते सर्वाधिक वादग्रस्त ठरले आहेत. नवे आयुक्त राजेश पाटील हे मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विश्वासातील आहेत. ओरिसा केडरचे 2005 च्या आयएएस बॅचचे अधिकारी असलेल्या पाटील यांना खास आंतरराज्य प्रतिनियुक्तीवर आणण्यात आले आहे. 

हर्डीकर हे आतापर्यंतच्या आयुक्तांत सर्वाधिक वादग्रस्त ठरलेले आहेत. तरीही ते मुदत संपूनही आयुक्त म्हणून राहिले होते, हे विशेष. ते तब्बल साडेतीन वर्ष आयुक्त म्हणून राहिले. कोरोनाने त्यांची बदली वर्षभर लांबवली होती. ते पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या कलाने कारभार करतात, असा आरोप विरोधी पक्ष शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला होता.

एवढेच नाही, तर सत्ताधाऱ्यांच्या हातातील कळसुत्री बाहुली, त्यांचा घरगडी अशी संभावनाही त्यांनी केली होती. स्मार्ट सिटीच्या कामात तीनशे ते पाचशे कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप शिवसेनेने करून त्यांच्या बदलीची मागणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. 

दरम्यान, महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर भाजपने सुद्धा आयुक्तांना लक्ष्य केले होते. त्यातही शहराचे कारभारी भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निशाण्यावर ते आले होते. त्यामुळे त्यांनी स्वःतहून बदलीची मागणी केली होती. दरम्यान, कोरोनाचा हॉट स्पॉट असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील ही साथ आटोक्‍यात आल्याने अखेर आज त्यांची बदली झाली. 

महापालिका निवडणूक वर्षभरावर आल्याच्या पार्श्वभूमीवर पाटील यांची नियुक्ती झाल्याने त्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले जात आहे. सत्ताधारी भाजप राजवटीत पहिला एफडीआर व आता कचरा घोटाळा समोर आला आहे. त्याशिवाय कोरोना साहित्य खरेदीत कोट्यवधीचा गैरव्यवहार झाल्याचा आरोपही झाला आहे. 

या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या तोंडावर फडणवीस समर्थक हर्डीकरांची बदली करण्यात येऊन तेथे ठाकरे आणि पवारांच्या मर्जीतील पाटील यांना आणण्यात आले आहे. पाटील हे 2005 च्या आयएएस बॅचचे ओरिसा केडरचे अधिकारी आहेत. ओरिसातील महानदीला 2008 ला आलेल्या महापुरात त्यांनी केलेले बचाव, मदत व पुनर्वसन कार्याचे कौतुक झाले होते. अनेक बक्षिसे त्यांनी मिळवलेली आहेत. आत्मचरित्रही त्यांनी लिहिले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com