विनायक मेटेंचा रोख कोणाकडे ; मुख्य आरोपींवर कारवाई कधी? 

छोट्यांवर कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली. परंतु, मुख्य आरोपींवर कारवाई कधी करणार, असा सवाल आमदार विनायक मेटे यांनी केला आहे.
Vinayak Mete2
Vinayak Mete2

बीड : बीड पंचायत समितीमध्ये मनरेगा अंतर्गत १६ ते १७ कोटी रुपयांची वेगवेगळी बेकायदा कामे भ्रष्टाचार कारण्यासाठी ऑनलाईन केली गेल्याचे चौकशीत समोर आले. तक्रारीनंतर यात सहभागी छोट्यांवर कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली. परंतु, मुख्य आरोपींवर कारवाई कधी करणार, असा सवाल शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केला आहे. त्यांनी पाठविलेल्या पत्रात बीडचे लोकप्रतिनिधी असा उल्लेख केल्याने त्यांचा रोख कोणाकडे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

यात सहभागी असणारे पंचायत समिती पदाधिकारी, त्यांना 'आशीर्वाद' असणारे बीडचे लोकप्रतिनिधी व त्यांचे अनधिकृत स्वीय सहायक, शासकीय अधिकारी, कमर्चारी, तत्कालीन गटविकास अधिकारी श्री तुरुकमारे, संबंधित विभागाचे इंजिनियर, एपीओ, ऑपरेटर, बेकायदा एजन्सी या सर्वांची चौकशी करून आवश्यक ती कारवाई झालेली नाही, असे विनायक मेटे यांनी शनिवारी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. 
 
एक महिन्यापूर्वी विनायक मेटे यांनी केलेल्या तक्रारीनंतर १६ कोटींहून अधिक रकमेची कामे नियम धाब्यावर बसवून ऑनलाईन केल्याचे समोर आले. यावरुन काही कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करुन त्यांच्यावर गुन्हे नोंद करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, एक महिना उलटला असताना देखील यातील मुख्य चौकशीचे काय झाले, हे जनतेसमोर आले नसल्याचे विनायक मेटे म्हणाले. छोट्या लोकांवर कारवाई करून चौकशीच्या नावाखाली दिशाभूल करण्याचा तर प्रकार होणार नाही ना? याची शंका येत चालली असल्याचे पत्रात म्हटले आहे.

बीड पंचायत समितीतील भ्रष्टाचारात येथील पदाधिकारी, त्यांना आशीर्वाद असणारे बीडचे लोकप्रतिनिधी व त्यांचे अनधिकृत स्वीय सहायक, शासकीय अधिकारी, कमर्चारी, तत्कालीन गटविकास अधिकारी, संबंधित विभागाचे इंजिनियर, एपीओ, ऑपरेटर, बोगस एजन्सी या सर्व लोकांनी संगनमत करून शासनाला फसवले असल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला.  

कडक कारवाईची मागणी

सामुदायिक पद्धतीने भ्रष्टाचार करणे, बीड पंचायत समितीचा कोड नंबर चोरून बाहेरून बेकायदा कामे ऑनलाईन करणे, चोरी करणे, फसवणूक करणे इत्यादी कलमाखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे आवश्यक असल्याचे आ मेटे यांनी पत्रात म्हटले आहे. भ्रष्टाचारामुळे बीडची प्रतिमा अगोदरच मलिन झालेली आहे. त्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे.  भ्रष्टाचारात जर लोकप्रतिनिधींचा सहभाग असेल तरीही कारवाई करायला हवीच. कायद्याचे राज्य जनतेस अपेक्षित आहे, असेही विनायक मेटे यांनी पत्रात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com