आता या जोडीला तरी दृष्ट लागू नये : कोणाला उद्देशून म्हणाल्या पंकजा मुंडे?  - What did Pankaja Munde say to Mahadev Jankar? | Politics Marathi News - Sarkarnama

आता या जोडीला तरी दृष्ट लागू नये : कोणाला उद्देशून म्हणाल्या पंकजा मुंडे? 

सरकारनामा ब्यूरो 
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

पंकजा मुंडे यांनी कर्तबगार आमदार म्हणून मोनिका राजळे आणि मेघना बोर्डीकर यांचा उल्लेख केला.

बीड : "माझे बंधू महादेव जानकर येथे उपस्थित आहेत, त्यांच्याशिवाय माझा कुठलाही कार्यक्रम कधी पूर्ण होत नाही. आता या जोडीला तरी दृष्ट लागू नये,' अशी अपेक्षा पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणाच्या सुरुवातीलाच व्यक्त केली. 

राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या जन्मगावी सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे बोलत होत्या. यंदा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे ऑनलाइन मेळावा झाला. या वेळी खासदार भागवत कराड, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार मोनिका राजळे, मेघना बोर्डीकर, भीमराव धोंडे, रमेश आडसकर, अक्षय मुंदड, केशव आंधळे आदी उपस्थित होते. 

पंकजा मुंडे यांनी कर्तबगार आमदार म्हणून मोनिका राजळे आणि मेघना बोर्डीकर यांचा उल्लेख केला. या दोघी कायम आमच्या सोबत दर कार्यक्रमाला येतात. त्यानुसार आजही त्या आल्या आहेत, असे सांगितले. 

मला तोडण्याचा प्रयत्न झाला, मी राजकारण सोडलं, घरात बसले असा अपप्रचार करण्यात आला. मात्र, मी शर्यतीत असेन आणि तोडणाऱ्यांनाही उत्तर देईन. अमिमन्यूला अर्धज्ञान असल्याने तो चक्रव्यूवाहत अडकला. मात्र, मला चक्रव्यूह तोडता येते, असा हल्लाबोल त्यांनी केला. 

पंकजा मुंडे म्हणाल्या, नुकसानभरपाईपोटी सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजचे स्वागत व अभिनंदन. मात्र, हे पॅकेज पुरेसे नाही, एवढ्या मदतीने शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार नाही, मायबाप सरकारने उदारता दाखवावी, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी दिला. 

ऊसतोडणी कामगारांच्या संघटना आपल्यासोबतच असून दोन बैठकांत मिटणारा हा प्रश्न दोन महिने का लांबला? मुंबईत बसून निर्णय होत नाहीत, तर ढाब्यावर बसून होतात का? असा सवालही त्यांनी केला. 

आपली खासदार शरद पवार, जयंत पाटील, जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासोबत चर्चा झाली असून पुढेही करू. ऊसतोड कामगारांच्या घामाची जाण आहे. त्यांना लाचारी नको, स्वाभीमान म्हणून आपण ऊसतोडणीस जा म्हणून सांगितले. लोक बैठकीनंतर बघू म्हणतात. तुमचा आकडा सांगा, पक्षाचे पत्रक काढून, दौरा करुन काय झाले, असा सवालही त्यांनी पक्षविरोधकांना केला. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर काम करणाऱ्यांना यूपीत पाठवू असा टोला लगावतांनाच तुमच्या 27 तारखेच्या बैठकीनंतर मी काय ते ठरवेल, असा इशारा दिला. 

मला पक्षाने राष्ट्रीय सचिवपद दिले असले तरी ही एक संधी आहे. मात्र, मी बीडची भूमिपुत्र असून हीच माझी कर्मभूमी आहे. मी महाराष्ट्रात लक्ष घालणार आहे. पूर्वी निधीचा पाऊस पाडला. आता रस्त्यावर उतरून जाब विचारू, असे म्हणत सरकारच्या चांगल्या कामाचे कौतुक करण्याची दानत असल्याचेही मुंडे यांनी नमूद केले. 
Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख