उदयनराजे, आता तुम्हीच पुढाकार घ्या : विनायक मेटे 

राज्य सरकार गेल्या 5-6 दिवसांपासून पोकळ आश्वासन देत असून कोणताही निर्णय घेत नाही.
Vinayak Mete's appeal to Udayan Raje to take initiative on Maratha reservation issue
Vinayak Mete's appeal to Udayan Raje to take initiative on Maratha reservation issue

बीड : मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयातून आलेल्या स्थगितीमुळे समाजामध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण पसरले आहे. याच चिंतेतून चाकूर तालुक्‍यातील बोरगाव येथील किशोर कदम नावाच्या मराठा समाजबांधवाने तीव्र नैराश्‍यातून आत्मबलिदान करण्याचा प्रयत्न केला. या युवकाला व त्याच्या कुटुंबीयाला भेटून धीर दिला, आरक्षणाची लढाई ही संघर्ष करून जिंकायची असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य सरकार गेल्या 5-6 दिवसांपासून पोकळ आश्वासन देत असून कोणताही निर्णय घेत नाही, राज्यभरातील मराठा संघटना, समन्वयकांना एका व्यासपीठावर घेऊन आरक्षण आंदोलनात छत्रपती उदयनराजेंनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार विनायक मेटे यांनी बीड येथे पत्रकार परिषदेत केले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांकडून फक्त पोकळ आश्वासने दिली जात आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवारदेखील कधीही मराठा आरक्षणावर बोलत नाहीत, समाज त्यांना मानतो, मात्र समाजासाठी ते बोलायला तयार नाहीत, आम्ही याबाबत मागणी केल्यानंतर ते अध्यादेश काढावा लागेल, इथपर्यंत बोलले.

राज्य सरकारने आरक्षणावर लवकर निर्णय घ्यावा, समाजाला न्याय द्यावा; अन्यथा समाजाला रस्त्यावर पुन्हा उतरण्याशिवाय पर्याय नसल्याचे मेटे म्हणाले. 


केंद्राच्या 10 टक्के आरक्षणाचा लाभ द्यावा 

महाराष्ट्राच्या आघाडी सरकारने 28 जुलै 2020 रोजी परिपत्रक काढून मराठा समाजाला एसईबीसी आरक्षण मिळत असल्यामुळे 10 टक्के आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, असा अन्यायपूर्वक आदेश काढला, तो आदेश महाराष्ट्र सरकारने ताबडतोब रद्द करावा आणि 10 टक्के आर्थिक दुर्बल घटक आरक्षण लाभ मराठा समाजाला मिळवून द्यावा, त्याकरिता आदेश काढावा आणि या स्थगितीमुळे मराठा समाजातील मुला-मुलींच्या शैक्षणिक प्रवेशावर आणि त्यांच्या फीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे.

आघाडी सरकारने मराठा समाजातील मुला मुलींच्या शिक्षणाचा सर्व खर्च आयटीआयपासून अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापकीय, आर्किटेक्‍चर, तंत्रशिक्षण, कौशल्यविकास, विविध पदविका अभ्यासक्रमाला लागणारी जी फीस असेल ती सर्व फी सरकारने भरावी, असे आवाहन मेटे यांनी केले. 

सारथीकडे सरकारचे दुर्लक्ष 

सारथी संस्था आघाडी सरकारने जी बंद पाडलेली आहे, त्यामधले तारादूतसारखे अनेक महत्वपूर्ण प्रकल्प बंद केले, शिष्यवृत्तीसुद्धा मिळत नाही, कर्मचारी वर्ग काढून टाकला आहे, याबाबत त्वरित निर्णय घ्यावा, सारथी संस्थेच्या माध्यमातून सर्व शिक्षणाचे काम व कोर्सेस सुरु करण्याचे काम करावे, याकरिता सारथीला 1 हजार कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही मेटे यांनी राज्य सरकारकडे केल्याचे सांगितले. मात्र, राज्य सरकार लक्ष द्यायला तयार नाही, असा आरोपही मेटे यांनी केला. 

अशोक चव्हाणांनी राजीनामा द्यावा 

अशोक चव्हाण यांना वारंवार सांगूनदेखील त्यांनी आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. आरक्षणाच्या स्थगितीला या सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार असून चव्हाण यांनी स्वतःहून राजीनामा द्यायला पाहिजे, असे देखील आमदार मेटे हे पत्रकार परिषदेत म्हणाले.

सर्व संघटना, समन्वयकांना एकत्रित करून छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आता सर्व संघटना, समन्वयकांना एकत्रित करून या आरक्षणाच्या लढाईमध्ये पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहन आमदार मेटे यांनी पत्रकार परिषदेच्या शेवटी केले. 

या वेळी शिवसंग्राम संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे, सरचिटणीस अनिल घुमरे, बबनराव माने आदींची उपस्थिती होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com