उद्धवजी, शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजारांची मदत देऊन बाळासाहेबांचा वारसा सिद्ध करावा  - Uddhavji should prove Balasaheb's legacy by giving Rs 50,000 per hectare to farmers | Politics Marathi News - Sarkarnama

उद्धवजी, शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजारांची मदत देऊन बाळासाहेबांचा वारसा सिद्ध करावा 

दत्ता देशमुख : सरकारनामा ब्यूरो 
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी परतीच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीची शनिवारी पाहणी केली. त्यांनी चिखल तुडवित पिकांची पाहणी केली. 

बीड : "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई सोडावी. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ हेक्‍टरी 50 हजार रुपये मदत देऊन बळिराजाच्या मदतीला सातत्याने धावणाऱ्या दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सिद्ध करावा,' असे आवाहन शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष, आमदार विनायक मेटे यांनी केले. 

परतीच्या पावसाने बीड जिल्ह्यात हाहाकार माजविला असून जोरदार पावसाने खरिपातील तूर, सोयाबीन, कपाशी, बाजरी पिके उद्‌ध्वस्त केली आहेत.

शनिवारी मेटे यांनी बीडसह शिरूर तालुक्‍यातील पौंडूळ, खांबा - लिंबा, खालापुरी आदी गावांत पीक नुकसानीची पाहणी केली. शेतात रस्ता नसल्याने मेटे यांनी बैलगाडीतून प्रवास केला. तसेच पॅंट दुमडुन त्यांनी चिखल तुडवित पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

मेटे म्हणाले, शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आलेले असताना मुख्यमंत्र्यांना काहीही देणेघेणे नाही. खासदार, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरही बीड जिल्ह्याने भरभरून प्रेम दिलेले आहे. मात्र, या जिल्ह्यातील शेतीचे नुकसान पाहण्यासाठी त्यांना वेळ नसल्याचा आरोप त्यांनी केला. 

सर्व बाबी बाजूला सारून सरकारने शेतकऱ्यांना तत्काळ हेक्‍टरी 50 हजार रुपयांची मदत द्यावी. पिकविम्याची किचकट पद्धत शेतकऱ्यांना समजत नाही, त्यामध्ये सोईस्करपणा आणावा, मुख्यमंत्र्यांनी आश्वासने देण्याचे सोडून शेतकऱ्यांना आधार द्यावा, असेही मेटे म्हणाले. 

मेटे यांच्या समवेत जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे, सरचिटणीस विनोद कवडे, बबन माने, प्रशांत गोळे, ज्ञानेश पानसंबळ, नारायण काशीद, ज्ञानेश्वर कोकाटे, श्री. धांडे, राजेंद्र आमटे, हनुमंत पवार, सुनील शिंदे, अक्षय माने, कृष्णा परजने, माउली शिंदे, दत्ता इंगळे, माउली परजने, संजय भिंगले, नारायण परजने, अनिल उगले, बप्पासाहेब जाधव, अशोक भाकरे, विजय सुपेकर होते. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख