ठाकरे सरकार अत्यंत घाबरट; मार्गदर्शक पवार मात्र मजा घेत आहेत 

राज्यात अकृत्रिम पद्धतीने तीन पक्षाचे सरकार सत्तेवर आले. या सरकारने राज्याची वाट लावली आहे.
Thackeray government very scared: Chandrakant Patil
Thackeray government very scared: Chandrakant Patil

लातूर : मराठा आरक्षण असो किंवा अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न असो यावर चर्चा न करता पळ काढण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा आहे. हे सरकार अत्यंत घाबरट आहे. या सरकारचे जे मार्गदर्शक आहेत, ते मात्र मजा घेत आहेत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी (ता. 10 नोव्हेंबर) नाव न घेता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केली. 

लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली या चार जिल्ह्यांतील पक्षाच्या आढावा बैठकीसाठी पाटील येथे आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी माजी मंत्री, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड, आमदार अभिमन्यू पवार, माजी आमदार सुधाकर भालेराव, शहराध्यक्ष गुरुनाथ मगे आदी उपस्थित होते. 

"कोरोनामुळे बाहेर फिरता आले नाही. तरीदेखील आम्ही ऑनलाइन बैठका घेत होतो. आंदोलनही केली. आता कोरोनाचा कहर कमी झाला आहे. त्यामुळे एका एका ठिकाणी चार ते पाच जिल्ह्यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. राज्यात 70 हजार कार्यकर्त्यांचे प्रशिक्षणही घेण्यात येत आहे. राज्यात पक्ष बळकटीवर भर देण्यात येत आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. 

"राज्यात अकृत्रिम पद्धतीने तीन पक्षाचे सरकार सत्तेवर आले. या सरकारने राज्याची वाट लावली आहे. नैसर्गिक संकटामुळे शेतकरी अडचणीत आहे. त्याला पुरेशी मदत दिली नाही. सत्तेत नसताना उद्धव ठाकरे हे जिरायतीसाठी हेक्‍टरी 25 हजार, तर बागायती शेतीसाठी हेक्‍टरी 50 हजारांची मदतीची मागणी करीत होते. आता तेच सत्तेवर असताना त्यांनी हेक्‍टरी दहा हजार व बागायती शेतीसाठी केवळ 25 हजारांची मदत जाहीर केली. ही अपुरी मदत दिवाळीपूर्वी मिळेल, असे सांगितले होते. 

या सरकारकडे बंगल्याची दुरुस्ती करणे, वाहन खरेदीसाठी पैसा आहे. पण, शेतकऱ्यांना मदत करायला पैसे नाहीत. एसटी कर्मचाऱ्याने तर ठाकरे सरकराच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. आता सरकारवर गुन्हा दाखल करणार का?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 

आमच्या दृष्टीने खडसेंचा विषय संपला 

आमच्या दृष्टीने एकनाथ खडसे हा विषय संपला आहे, असे सांगून राज्य सरकारकडून नागपूरचे अधिवेशन रद्द करण्याचा घाट घातला जात आहे. मुंबईत किमान पंधरा दिवसांचे हे अधिवेशन घ्यावे, अशी आमची मागणी आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात हे सरकार गंभीर नाही, असा आरोपही त्यांनी केला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com