मुख्यमंत्री ठाकरेंना तुमचे अश्रू अन्‌ भावनांची कदर : जयदत्त क्षीरसागर  - taking care your tears and feelings to Chief Minister Thackeray: Jaydatta Kshirsagar | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्री ठाकरेंना तुमचे अश्रू अन्‌ भावनांची कदर : जयदत्त क्षीरसागर 

दत्ता देशमुख : सरकारनामा ब्यूरो 
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शनिवारी अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून धीर दिला. 

बीड : महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांचे हित पाहणारे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तुमचे अश्रू अन्‌ तुमच्या भावनांची कदर आहे. मुख्यमंत्री तुमच्या पाठीशी खंबीर आहेत, धीर सोडू नका. नुकसानीचे पंचनामे पूर्ण होत आहेत, शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम हे सरकार नक्की करेल, असा धीर शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शेतकऱ्यांना दिला. 

परतीच्या पावसाने जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान झाल्यान शेतकरी हवालदिल आहेत. शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शनिवारी (ता. 17 ऑक्‍टोबर) बीड मतदार संघातील शिरुर कासार तालुक्‍यातील रायमोहा, डिसलेवाडी, तागडगाव तसेच, बीड तालुक्‍यातील आनंदवाडी, बाभूळखुंटा, जरूड फाटा आदी गावांच्या शिवारात जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेऊन धीर दिला. 

यंदा निसर्गाच्या अवकृपेने परतीच्या पावसाने प्रचंड नुकसान केले आहे. खरीप हंगाम उद्‌ध्वस्त झाला आहे. कापूस, तूर, सोयाबीन, बाजरी पिके नेस्तनाबूत झाली आहेत. मात्र, शेतकरी खचू नये असे जयदत्त क्षीरसागर म्हणाले. 

क्षीरसागर म्हणाले, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांना सर्व बाजूने मदत केली पाहिजे. सरसकट नुकसान भरपाई द्यावी, पंचनामे होत राहतील, शेतकऱ्यांना तातडीची मदत होणे गरजेचे आहे. यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या तातडीच्या मदतीची गरज आहे.

शेती व मातीसाठी आता कटिबद्ध राहणे, ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राशी दुजाभाव न करता मदत करणे गरजेचे आहे. सरकार शेतकऱ्यांचे आहे. सर्वसामान्यांचे आहे. त्यासाठी सरकारने तो विश्वास सार्थ करून दाखविला पाहिजे. 

क्षीरसागर यांच्या समवेत जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, बाजार समिती सभापती दिनकर कदम, दूध संघाचे अध्यक्ष विलास बडगे, अरुण डाके, राजेंद्र राऊत, परमेश्वर सातपुते, नानासाहेब काकडे, सखाराम मस्के, सुनील सुरवसे, सभापती उषा सरवदे, सुधाकर मिसाळ, वसंत सानप, सतीश काटे, नारायण परजणे, सुनील गाडेकर, सुभाष क्षीरसागर, सुलेमान पठाण, संजय सानप आदी होते. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख