....तर ऊसतोड मजूर दुर्गेचा अवतार घेतील : पंकजा मुंडे  - Sugarcane workers will take the form of Durga if no respectable settlement is reached on wage hike: Pankaja Munde | Politics Marathi News - Sarkarnama

....तर ऊसतोड मजूर दुर्गेचा अवतार घेतील : पंकजा मुंडे 

सरकारनामा ब्यूरो 
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

मागच्या काही काळापासून ऊसतोड मजुरांचा संप सुरू आहे. पंकजा मुंडे नुकत्याच परदेशातून मुंबईत परतल्या आहेत. त्यांनी या संपाबाबत पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट केली. 

बीड : येत्या दुर्गाष्टमीपर्यंत ऊसतोड मजुरांच्या कोयत्याला निश्‍चित न्याय मिळेल, असा विश्वास भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. मात्र, जर सन्मानजनक न्याय मिळाला नाही, तर ऊसतोड कामगार आक्रमक होऊन दुर्गेचा अवतार घेतील, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. 

दरम्यान, काही काळ परदेशात असलेल्या पंकजा मुंडे नुकत्याच मुंबईत परतल्या आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा या विषयावर आपली भूमिका आक्रमकपणे मांडत संपाबाबत पुढील दिशा स्पष्ट केली. 

मागच्या काही दिवसांपासून ऊसतोड मजुरांच्या दरवाढीचा आणि मुकादमांच्या कमिशन व सुविधांमध्ये वाढ करण्याच्या मागणीसाठी संप सुरू आहे. मागण्या मान्य होईपर्यंत कोयता हातात घ्यायचा नाही, अशी भूमिका ऊसतोड कामगारांच्या विविध संघटनांनी घेतली आहे.

याबाबत यापूर्वीही भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत ऊसतोड कामगारांची व मुकादमांची बाजू लावून धरली आहे. 

ऊसतोड कामगारांनी दरवाढीसाठी संप सुरू केला आहे. येत्या दुर्गाष्टमीपर्यंत ऊसतोड मजुरांना न्याय मिळेल, असा विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पूर्वी साखर संघासोबत ज्या बैठका झाल्या, त्यात याविषयी मी आग्रही भूमिका मांडली आहे. तथापि, दुर्गाष्टमीपर्यंत मजुरांना न्याय मिळाला नाही, तर ऊसतोड मजूर दुर्गेचा अवतार घेतील, असा इशाराही त्यांनी दिला. 

ऊसतोडणी मजुरीत वाढ व्हावी. तसेच, अन्य विविध मागण्यांसाठी ऊसतोड मजूर संपावर असले तरी लवकरात लवकर मागण्या मान्य नाही झाल्या तर मजूर आक्रमक होतील, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.  

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख