चंद्रकांतदादांनी पत्र लिहिणं म्हणजे सगळ्यांचीच दाणादाण उडणार.. - Shiv Sena criticizes Chandrakant Patil letter writing Sanjay Raut | Politics Marathi News - Sarkarnama

चंद्रकांतदादांनी पत्र लिहिणं म्हणजे सगळ्यांचीच दाणादाण उडणार..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 4 जानेवारी 2021

पाटलांनी भाषाशुद्धीची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. भाजपमध्ये नवे तर्खडकर उदयास आले आहे.

मुंबई : ''चंद्रकांतदादांचे पत्रलेखन हे उकळत्या किटलीतील रटरटत्या चहासारखे आहे. दादांनी पत्र लिहिणे म्हणजे सगळ्यांचीच दाणादाण उडणार. पुन्हा भाषाशुद्धीची मोहीम त्यांनी सुरूच केली आहे. दादा, उचला लेखणी, करा त्या ढोंगावर हल्ला! महाराष्ट्राला एक नवा पत्रमहर्षी लाभला आहे,'' अशी टीका भाजपचे प्रदेशाअध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर 'सामना 'च्या अग्रलेखातून कऱण्यात आली आहे. 

सामनामधून माझ्यावर गलिच्छ भाषेत अग्रलेख लिहिला होता. याबाबतीत आताही संजय राऊत यांनी आपल्या यांच्या ईडीची नोटीस आल्यावर तशीच भाषा वापरली आहे. मी 'सामना'च्या संपादिका रश्मी वहिनींना पत्र लिहिणार आहे. ही तुमची भाषा असू शकत नाही. मग अग्रलेखात ही भाषा कशी, असे त्यांना विचारणार आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच सांगितले होते. यावर खासदार संजय राऊत यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं  होते.

संजय राऊत म्हणाले, ''अरे बापरे… ताबडतोब… लगेच. मला आता त्यांची भीती वाटतेय… ते पत्र लिहतायेत.. वा वा. सामना वाचतात. सामना वाचायला लागले चांगली गोष्ट आहे. कालपर्यंत वाचत नव्हते. आता सामना वाचत राहिले, तर त्यांच्या जीवनात भरपूर बदल होतील.''''सकारात्मक नजरेतून महाराष्ट्र आणि देशाकडे बघतील. सामना वाचत राहिले, तर त्यांचा विश्वास बसेल की, पुढच्या पाच वर्षांपर्यंत महाविकास आघाडीचं सरकार राहणार आहे,” असा टोलाही राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला होता. आजच्या अग्रलेखातही चंद्रकांतदादा यांच्यावर सडकून टीका कऱण्यात आली आहे. 

दादांनी पत्र लिहिणे म्हणजे सगळ्यांचीच दाणादाण उडणार. पुन्हा भाषाशुद्धीची मोहीम त्यांनी सुरूच केली आहे. प. बंगालातील भाजप नेत्यांची अलीकडची भाषणे दादांच्या हवाली करूया. तेथे भाषाशुद्धीसंदर्भात मोठे काम चंद्रकांत पाटलांना करावे लागणार आहे. चीनने लडाखची जमीन गिळली तरी चालेल, पण मुंबईतल्या इंच इंच जमिनीसाठी किटल्यांनी उकळायलाच पाहिजे! राज्यातील विरोधी पक्षाला त्यांच्या जबाबदाऱ्या व कर्तव्ये याबाबत प्रशिक्षण देण्याची गरज आहे. बहकलेला विरोधी पक्ष हा महाराष्ट्रातील चिंतनाचा विषय ठरला आहे, पण चिंतन करायचे कोणी? भारतीय जनता पक्षाच्या चिंतन व मंथन बैठका अधूनमधून होत असतात, पण एक महाचिंतन बैठक घेऊन सध्याच्या विरोधी पक्षाने विधायक कार्यात कसे गुंतवून घ्यावे, याबाबत मार्गदर्शन होणे गरजेचे आहे, असे अग्रलेखात म्हटलं आहे. 

काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात..

  1. देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते आहेत, पण ‘चायपेक्षा किटली गरम’ असे काही लोकांचे सुरू आहे. उठसूट फक्त विरोध, दुसरे काही नाही.
  2. भाजपच्या ध्यानीमनी, स्वप्नी ‘बिल्डर’च आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्याही निर्णयात बिल्डरच दिसत असावेत. 
  3. भारतीय जनता पक्षाचा ढोंगाचा बुरखा चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या मशहूर पत्रलेखकांनी आता फाडायलाच हवा. 
  4. चंद्रकांत पाटील हे हल्ली वाचकांची पत्रे, तक्रारी सूचना वगैरे सदरांखाली पत्र लिहून अनेक विषयांना वाचा फोडतात. 
  5. पाटलांनी भाषाशुद्धीची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. भाजपमध्ये नवे तर्खडकर उदयास आले आहे.
  6. आता संपूर्ण भाजपला त्यामुळे ‘गलिच्छ’ विचार आणि भाषेला तिलांजली द्यावी लागेल.
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख