साखर महासंघाच्या त्या निर्णयावर समाधानी : पंकजा मुंडे - Satisfied with the decision of the Sugar Federation : Pankaja Munde | Politics Marathi News - Sarkarnama

साखर महासंघाच्या त्या निर्णयावर समाधानी : पंकजा मुंडे

सरकारनामा ब्यूरो 
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

ऊसतोड कामगारांचे नेतृत्व हा माझ्यासाठी महत्वाचा विषय नाही, त्यांचं पालकत्व माझ्यासाठी महत्वाचं आहे. 

पुणे : ऊसतोड मजुरांच्या मजुरीत किती वाढ व्हावी, असा कुठलाच आकडा मी जाहीर केला नव्हता. साखर महासंघाकडून आज जी सरासरी 14 टक्‍क्‍यांची वाढ मिळाली आहे, त्यावर आम्ही समाधानी आहोत, असे भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पुण्यात बोलताना सांगितले. 

ऊसतोड कामगार, मुकादम आणि वाहतुकीच्या दरात सरासरी 14 टक्‍क्‍यांनी वाढ करण्यात आली आहे. या वाढीला सर्व संघटनांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारांनी संप मागे घेतला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी आज दिली. दरम्यान, भाजपचे आमदार सुरेश धस यांनी ही वाढ कमी असल्याचे सांगत फेब्रुवारीत पुन्हा संप करण्याचा इशारा दिला आहे. 

मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीला सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील यांच्यासह ऊसतोड कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

पंकजा म्हणाल्या की, गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळ लवकरच कार्यान्वित होणार आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये त्याची नोंदणी सुरू होईल. त्यातून ऊसतोड मजुरांचे अनेक प्रश्न मिटतील. ऊसतोड कामगारांचे नेतृत्व हा माझ्यासाठी महत्वाचा विषय नाही, त्यांचं पालकत्व माझ्यासाठी महत्वाचं आहे. 

धनंजय मुंडेंबाबत काय म्हणाल्या पंकजा? 

जनतेच्या प्रश्नावर एकत्र असण्यात काही वावगं नाही, याचा अर्थ मागचं सगळं मिटलं असा नाही, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याबरोबर भविष्यातही आपला राजकीय संघर्ष सुरू राहील, असे सूचित केले. 

ऊस तोडणी कामगारांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी आज (ता. 27 ऑक्‍टोबर) ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत ऊस तोडणी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीसाठी एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक धनंजय मुंडे, पंकजा मुंडे एकत्र आले होते. त्या पार्श्‍वभूमीवर विचारलेल्या प्रश्‍नावर पंकजा यांनी वरील उत्तर दिले. 

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि माझ्याबाबत काही चांगलं होणार नाही. कारण चांगलं झालं तर आमच्या दोघांच्या पक्षात प्रॉब्लेम होईल. मी त्यांच्याबाबत कायम दिलदारी दाखवली आहे. त्यांना पुरस्कार मिळाला तर मी अभिनंदन केले. आजारी असताना विचारपूस केली, अशा गोष्टींमध्ये मी कधीही विसंवाद आणत नाही, असेही पंकजा मुंडे या वेळी म्हणाल्या. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख