कोरोनामुक्त झालेल्या बच्चू कडू यांनी केला प्लाझ्मा दान

कोरोनाबाधित अनेक रुग्णांना प्लाझ्मामुळे जीवनदान मिळाले आहे.
Plasma has been donated by Bachchu Kadu in amravati
Plasma has been donated by Bachchu Kadu in amravati

अमरावती : राज्यात अनेक भागात कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध होताना दिसत नाही. अॅाक्सीजनचा तुटवडा आहे. अजूनही रेमडेसिविर इंजेक्शनसाठी नातेवाईकांना धावाधाव करावी लागत आहे. तसेच कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांकडून प्लाझ्मा दानही केले जात नाही. परिणामी, मोठ्या प्रमाणावर प्लाझ्माचाही तुटवडा भासत आहे.

कोरोनाबाधित अनेक रुग्णांना प्लाझ्मामुळे जीवनदान मिळाले आहे. पण प्लाझ्माचा तुटवडा असल्याने अनेकांना प्लाझ्मा वेळेत मिळत नाही. त्यामुळे राज्यमंत्री राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय येथे प्लाझ्मा दान केला. बच्चू कडू यांना काही दिवसांपूर्वी कोरोना झाला होता. त्यातून बरे झाल्यानंतर ठराविक कालावधीनंतर त्यांनी प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला. 

कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णाच्या शरीरात ज्या अँटीबॉडीज तयार होतात त्या प्लाझ्माच्या स्वरूपात दुसऱ्या रुग्णांना दिल्या जातात. त्यामुळे संबंधित रुग्णाची प्रकृती सुधारण्यात मदत होते. अनेक रुग्ण प्लाझ्मामुळे बरे झाले आहेत. त्यामुळे रुग्णालयांकडून प्लाझ्माची मागणी केली जाते. पण रक्तपेढ्यांमध्ये रक्ताप्रमाणेच प्लाझ्माचाही तुटवडा जाणवत आहे. यापार्श्वभूमीवर कडू यांनी प्लाझ्मा दान केल्यानंतर कोरोनातून बरे झालेल्या सर्वाना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले. 

लसीकरणाआधी करा रक्तदान

राज्यात १ मे पासुन १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र लस घेतल्यानंतर ६ महिने रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे लसीकरणाच्या अगोदर रक्तदान करावे असे आवाहनही बच्चू कडू यांनी यावेळी सर्व युवकांना केले.

राज्यात मोफत लस

राज्यातील 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले. पण प्रत्यक्षात लसीकरणाला विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लशींचा साठा नसल्याने राज्यातील अनेक केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. त्यामुळे 18 वर्षांवरील नागरिकांना लगेचच लस मिळणे कठीण असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com