marathi kranti morcha warns govt on various demands | Sarkarnama

मराठा क्रांती ठोक मोर्चाचा सरकारला शेवटचा इशारा : बलिदान ते आत्मबलिदान आंदोलन २३ जुलैपासून

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 29 जून 2020

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांचा निपटारा करावा, अन्यथा राज्यभर विविध प्रकारची आंदोलने केली जातील आणि हा शेवटचा इशारा असल्याचे सांगण्यात आले आहे.

औरंगाबाद : कोपर्डीची पीडित तरुणी; तसेच कायगावचे हुतात्मा काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व सरकारला जाग आणण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे ‘बलिदान ते आत्मबलिदान’ या महाएल्गार आंदोलनाला ता. २३ जुलैपासून सुरवात होणार आहे. महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांचा निपटारा करावा, अन्यथा राज्यभर विविध प्रकारची आंदोलने केली जातील आणि हा शेवटचा इशारा असल्याचे सांगण्यात आले आहे.

कायगाव टोका येथील काकासाहेब शिंदे यांच्या पुतळ्याजवळ एकत्रित येऊन हा निर्णय घेतला आहे. यावेळी रमेश केरे, आप्पा कुढेकर यांची उपस्थिती होती. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल; तसेच पुढील होणाऱ्या परिणामास सरकार जबाबदार असेल, असेही प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

या आहेत प्रलंबित मागण्या
१) कोपर्डी प्रकरणातील आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी.
२) सर्वोच्च न्यायालयात सात जुलै रोजी मराठा आरक्षणाची सुनावणी आहे, यासाठी राज्य शासनाने आपली भक्कम बाजू मांडावी.
३) मराठा आरक्षणासाठी ४२ बांधवांनी बलिदान दिले, त्यांना सरकारने तत्काळ दहा लाख रुपये आणि कुटुंबातील सदस्याला शासकीय सेवेत समाविष्ट करावे.
४) आझाद मैदानावर ४७ दिवस चाललेल्या २०१४ च्या ईएसबीसी उमेदवारांना न्याय देऊन सरकारी नोकरीत घेण्यात यावे.
५) सारथी संस्था सुरू करून त्याचा विद्यार्थ्यांना लाभ देण्यात यावा.
६) अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेचा सर्वसामान्य युवकांना लाभ उपलब्ध करून देण्यासाठी बँकांना आदेशित करावे.
७) प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधांसह तत्काळ वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख