परभणी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत खासदार संजय जाधव यांनी चक्क महावितरणच्या अभियंत्याचे पाय धुतले. मंगळवारी विजेच्या प्रश्नावर कोणतेही उत्तर न मिळाल्याने अखेर खासदारांना हा पवित्रा घ्यावा लागला.
परभणी जिल्ह्यात शेतीशी निगडित अनेक प्रश्न महावितरणच्या कार्यालयात प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांना रोहित्र देण्यासाठी महिन्याभराचा कालावधी लावला जात आहे; तसेच तासंतास वीज गायब राहत असल्याने शेतीची कामेदेखील खोळंबत आहेत. यासंदर्भात मंगळवारी दोन ते तीन गावांतील शेतकरी खासदार संजय जाधव यांच्याकडे तक्रार घेऊन आले होते. अनेकवेळा महावितरणच्या कार्यालयात गेल्यानंतर अधिकारी भेटत नसल्याने हा विषय तसाच प्रलंबित राहिला होता. त्यामुळे चिडलेल्या खासदार संजय जाधव यांनी मंगळवारी थेट महावितरणचे कार्यालय गाठले. तेथील अधिकाऱ्यांना बोलावून शेतकऱ्यांच्या कामासंदर्भात जाब विचारला. परंतु कोणत्याच प्रश्नाचे बरोबर उत्तर न मिळाल्यामुळे खासदार संजय जाधव यांनी चक्क तेथे उपस्थित असलेल्या अभियंत्याचे पाय पाण्याने धुतले. या प्रकारामुळे गांगारून गेलेल्या अभियंत्यांना मात्र घाम फुटला. जर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले जात नाहीत तर महावितरणच्या कार्यालयात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा खासदार जाधव यांनी दिला आहे.
गेल्या आठवड्यात शेतक-यांना पीककर्ज मिलत नसल्याने आमदारांनी आंदोलन केले होते. त्यासंदर्भात पाठपुरावा करुन देखील बॅंकेचे शाखाधिकारी दाद देत नसल्याने आमदारांनी त्यांचे पाय धतुले होते. त्यानंतर खासदारांनी त्याच स्वरुपाचे आंदोलन केले आहे. त्यामुळे हे आंदोलनम चर्चेचा विषय ठरला आहे.
....
https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

