लातूर झेडपीचे अध्यक्ष आले अन्‌ सभा रद्द झाल्याचे सांगून गेले! - Latur ZP president came and said that the meeting was canceled! | Politics Marathi News - Sarkarnama

लातूर झेडपीचे अध्यक्ष आले अन्‌ सभा रद्द झाल्याचे सांगून गेले!

सरकारनामा ब्यूरो 
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने सभेत बहुसंख्य सदस्यांनी ऑनलाइन हजेरी लावली होती. या पूर्वीच्या 16 जूनच्या सभेत मोजकेच सदस्य ऑनलाइन होते.

लातूर : लातूर जिल्हा परिषदेची गुरुवारी (ता. दहा) दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आलेली ऑनलाइन सर्वसाधारण सभा काही सेकंदात गुंडाळण्यात आली. अध्यक्ष राहुल केंद्रे हे सभेत काही सेकंदासाठी आले आणि त्यांनी सभा रद्द झाल्याचे जाहीर करून टाकले.

त्यास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी जोरदार आक्षेप घेतला. त्यावर चर्चा सुरू असतानाच सभेची ऑनलाइन प्रक्रिया बंद करून टाकत अध्यक्षांनी काढता पाय घेतला. काही क्षणात घडलेल्या प्रकाराची माहिती नसलेले पदाधिकारी, सदस्य व अधिकारी तासभर सभा सुरू होण्याची ऑनलाइन प्रतीक्षा करत राहिले. 

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने सभेत बहुसंख्य सदस्यांनी ऑनलाइन हजेरी लावली होती. या पूर्वीच्या 16 जूनच्या सभेत मोजकेच सदस्य ऑनलाइन होते. गुरुवारी अनेक सदस्य पंचायत समिती कार्यालयातून सहभागी झाले होते. काहींनी घरून, घराच्या दारातून, शेतातून व वाहनात बसून सभेत सहभाग दिला होता. दुपारी एकपूर्वीच अनेकजण झूम ऍपद्वारे सभेला उपस्थित होते. 

दहा मिनिटानंतर तिरुके यांनी अध्यक्षांना बोलावून सभा सुरू करण्याची विनंती सभेचे सचिव व उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव यांना केली. त्यानंतर काही वेळांनी अध्यक्ष केंद्रे आले व त्यांनी लगेच सभा रद्द झाल्याचे जाहीर केले. त्याला तिरुके यांनी आक्षेप घेतला. या पद्धतीने सभा रद्द किंवा तहकूब करता येत नसल्याचे त्यांनी सांगताच जाधव यांनी अध्यक्षांना तसे अधिकार असल्याचे नियमाचा आधार घेऊन सांगितले. तिरुके याविषयावर बोलत असतानाच केंद्रे यांनी सभेची ऑनलाइन प्रक्रिया रद्द करून टाकली. 

काहीतरी तांत्रिक अडचण आल्याचे समजून तिरूके यांच्यासह अनेक सदस्य व अधिकारी सभेत पुन्हा सहभागी झाले. त्यांनी सभा सुरू होण्याची प्रतीक्षा केली. एका सदस्याने तर दुसऱ्या कोणाला तरी अध्यक्ष करण्याची सूचना केली.

सदस्यांनी आपापसांत कुठे बसलात, चहापाणी झाले की नाही, आदी प्रश्न करून संवाद साधला. अजून काही चालू नाही बाबा, असेही काहीजण बोलत होते. अर्धा तासाने एकानंतर एक सदस्य ऑनलाईन बैठकीतून बाहेर पडू लागले. सभा रद्द झाल्याची माहिती नसलेले अधिकारी व सदस्य दोनपर्यंत ऑनलाइन दिसले. यात बांधकाम सभापती संगीता घुले यांचाही समावेश होता. 

काय संकट आहे, कळेना? 

याबाबत तिरूके म्हणाले, सभा रद्द करायची झाली तरी सभेचे नियम व सभ्यता पाळली पाहिजे. राष्ट्रगीताने सभेची सुरवात करावी लागते. त्यानंतर सदस्यांचे मते जाणून घेऊन आणि कारण देऊनच सभा तहकूब करण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे. गुरुवारच्या सभेत नियमांचा भंग केला आहे. सभेत येऊन लगेच ती रद्द झाल्याचे सांगून जाणे चुकीचे आहे. आधीच सांगितले असते तर सदस्यांचा वेळ वाया गेला नसता. कोरम पूर्ण असताना सभा रद्द करण्यासाठी काय संकट आहे, हे कळेना गेले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख