It is wrong for BJP to call the courtyard a 'battlefield' ...! | Sarkarnama

भाजपकडून अंगणालाच 'रणांगण' म्हणणे चुकीचे...!   

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 23 मे 2020

अंगणालाच 'रणांगण' म्हणणे अत्यंत चुकीचे, विरोधाभासी असल्याची प्रतिक्रिया सावता परिषदेचे  अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी व्यक्त केली आहे.

बीड : भारतीय संस्कृतीमध्ये अंगणाचे महत्त्व व पावित्र्य मोठे आहे. मात्र, सुसंस्कृतपणाचा टेंभा मिरविणाऱ्या भारतीय जनता पार्टीकडून अंगणालाच 'रणांगण' म्हणणे अत्यंत चुकीचे, विरोधाभासी असल्याची प्रतिक्रिया सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी व्यक्त केली आहे.

कल्याण आखाडे म्हणाले, "अंगण म्हटले की, सडा- सारवण, रांगोळी, तुळशीवृंदावन अशा प्रकारचे मनाला प्रसन्नता देणारं चित्र डोळ्यासमोर येते तर 'रणांगण' म्हटलं की घनघोर लढाई, रक्तमांसाचा सडा असलं मनाला खिन्नता देणारं विचित्र चित्र डोळ्यासमोर उभं राहते.

कोरोनाच्या जागतिक आपत्तीच्या काळात आंदोलन करण्याचा विचार येणे ही एक प्रकारची दुर्बुद्धीच म्हणावी लागेल. आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी, आपल्या न्याय हक्कासाठी तसेच आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आंदोलन छेडण्याचा संवेधानिक अधिकार सर्वांनाच मिळालेला आहे. तथापि, भारतीय जनता पार्टीने राज्याच्या संकटकाळी पुकारलेले बचाव आंदोलन म्हणजे निव्वळ नौटंकी ठरले आहे. वेळ- काळ याचे भान ठेवायला पाहिजे होते, अशा तीव्र भावना जनमाणसामध्ये उमटल्या आहेत. 

 

जेवढा गाजावाजा केला गेला त्या तुलनेत मिळालेला अत्यल्प प्रतिसाद पाहून राज्यातील जनतेने आंदोलनाचा सपसेल फज्जा उडून भारतीय जनता पक्षाच्या या मानसिकतेला झिडकरल्याचे स्पष्टपणे दिसून आले. यामुळे भाजपचे पुरते हसं झाले असून सत्ता विरहातून हे सगळं घडत आहे, हे न समजण्या इतपत जनता दुधखुळी नाही, असेही त्यांनी पत्रकात शेवटी म्हटले आहे.

आंदोलनाला राष्ट्रवादीचे जशास तसे उत्तर

पुणे : कोरोनाच्या संकटात काम करण्यास राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत भारतीय जनता पक्षाने समाज माध्यमांबरोबरच प्रत्यक्षात आंदोलन करून राज्य सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पुण्यातील कार्यकर्त्यांनी भाजपाला जशास तसे उत्तर देण्याचा निश्‍चय केला आहे. 'मी कोरोना योद्धा, मी सरकारसोबत' ही टॅग लाइन वापरून समाज माध्यमाच्या फेसबुक, टविटर या व्यासपीठावर भाजपाच्या विरोधात हे कार्यकर्ते लढणार आहेत. संकटाच्या काळात सरकारच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी भाजपा खुर्चीसाठी निर्लज्जपणा करीत आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यकर्ते प्रदीप देशमुख यांनी केला आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख