मशाल मार्चमध्ये आमदार - खासदारांनीही यात सहभागी व्हावे: विनायक मेटे - The issue of reservation is not only for the Marathas, but also for a large section of the society the Vinayak Mete | Politics Marathi News - Sarkarnama

मशाल मार्चमध्ये आमदार - खासदारांनीही यात सहभागी व्हावे: विनायक मेटे

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

 मशाल मार्चमध्ये आमदार - खासदारांनीही यात सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केले.

बीड :  सात नोव्हेंबरला बांद्रा ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीवर धडकणाऱ्या मशाल मार्चला शिवसंग्रामचा पाठिंबा असून शिवसंग्रामही यात सहभागी होणार असल्याची माहिती, शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी दिली.

‘मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज’ यांच्या वतीने निघणाऱ्या या मशाल मार्च मध्ये सर्वच आमदार खासदारांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही मेटे यांनी केले. हा प्रश्न केवळ मराठा आरक्षण नाही तर समाजातील मोठ्या घटकाचा आहे,असे  मेटे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले. विद्यार्थी परिषदेचे अशोक सुखवसे, ॲड. शशिकांत सावंत, अॅड. शेळके, बबन शिंदे, ॲड. दोडके, मुकुंद गोरे उपस्थित होते.     

मशाल मार्च हा राज्य सरकारच्या मराठा आरक्षणाबाबतच्या हलगर्जीपणाच्या धोरणाविरुद्ध आहे.  मंत्रिमंडळातील सदस्य बेजबाबदार पणे बोलत आहेत, मराठा आरक्षण उपसमितीची अध्यक्ष अशोक चव्हाण हलगर्जीपणाने वागत आहेत,चव्हाणांना पदावरून हटवून योग्य व्यक्तीची निवड करावी, अशी मागणीही विनायक मेटे यांनी केली. 

समाजाला न्याय देण्यासाठी योग्य धोरण आखावे. मुख्यमंत्र्यांनी मागणी मान्य केली नाही तर राज्यपालांना भेटणार असल्याचेही मेटे म्हणाले. घटनात्मक पद्धतीने राज्य कारभार चालावा यावर देखरेख करण्याची जबाबदारी राज्यपालांचीच असते. त्यासाठीच हे पद असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, 5 नोव्हेंबरला बीडमध्ये मराठा आरक्षण युवा व विद्यार्थी परिषदेचे होणार आहे.

जिल्ह्यातील मराठा समाजातील अभ्यासू युवकांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. युवक - विद्यार्थ्यांना आरक्षणसंबंधी मार्गर्दर्शन, योग्य कायदेशीर माहिती मिळावी, आरक्षण लढ्यासाठी आवश्यक या परिषदेच्या माध्यमातून दिली जाणार असल्याचेही विनायक मेटे यांनी सांगितले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख