बीड : माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील बाजार समितीने शेतकऱ्यांच्या कापसाची नोंद चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप करत आमदार संदीप क्षीरसागर शेतकऱ्यांसह बुधवारी बाजार समितीत गेले. मागच्या पुढे व पुढच्या नोंदी मागे केल्याचा आरोपही त्यांनी केला. बाजार समितीच्या बाहेर उभे असलेली सर्व वाहनातील कापूस खरेदी केला जाईल, किरकोळ कारणावरून नाकारलेला कापूसही खरेदी केला जाईल व उशिरापर्यंत नोंद घेतली जाईल, असे आश्वासन बाजार समितीचे सचिव शिनगारे यांनी आमदार क्षीरसागर यांना दिले. यावेळी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था शिवाजी बडे उपस्थित होते.
जिल्ह्यात केंद्रीय कापूस निगम व महाराष्ट्र कापूस पणन महासंघाच्या माध्यमातून कापूस खरेदी करण्यात येत आहे. दरम्यान, मागच्या काळात शेतकऱ्यांकडील शिल्लक कापसाची नोंद स्थानिक बाजार समितीमध्ये करावी, बाजार समितीने नोंदीप्रमाणे टोकन द्यावे व त्यानुसार हमीभाव खरेदी केंद्रावर खरेदी केली जावी, असा नियम आहे. बीडमध्ये सहा हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नोंद केली आहे.
मात्र, बाजार समितीने शेतकऱ्यांच्या नोंदी मागे ठेवून व्यापाऱ्यांच्या नोंदी पुढे घेतल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी क्षीरसागर यांच्याकडे केल्या. त्यानंतर क्षीरसागर यांनी शेतकऱ्यांसह बाजार समिती गाठली व अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांसमोर जाब विचारला. रात्री उशिरापर्यंत नोंद करा, बाहेर उभी असलेली वाहने आत घेवून कापूस खरेदी केंद्रामार्फत त्याची खरेदी करा, एकाही शेतकर्यांवर अन्याय झाला तर गाठ माझ्याशी आहे, असे खडे बोल त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.
सहा दिवसापासून बाजार समितीच्या आवारात कापसाची वाहने घेऊन शेतकरी उभे आहेत. तरी देखिल नोंदीचा नंबर येवून देखिल बाजार समितीकडून टोकन दिल्या जात नाही. उशिरा टोकन दिल्यानंतर जिनिंग चालक वजन काटा होऊनही कापूस घेण्यास तयार नसल्याने नालवंडी येथील शेतकरी हवालदिल झाले होते. संबंधित जिनिंगवरील ग्रेडर शेतकर्यांच्या व्यथा समजून घ्यायला तयार नव्हते. त्यांचाही प्रश्न आमदार संदीप क्षीरसागर यांनी सोडविला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.