आजपर्यंत समाजकारण केले; आता मात्र मनात ठेवून राजकारण करणार : धनंजय मुंडे - I Will win all upcoming elections : Dhananjay Munde | Politics Marathi News - Sarkarnama

आजपर्यंत समाजकारण केले; आता मात्र मनात ठेवून राजकारण करणार : धनंजय मुंडे

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 15 जुलै 2021

काही जण म्हणाले, मनात राजकारण आणले नव्हते. पण, आता आणणार, हे मी जन्मादिवशी ठरवले आहे.

परळी वैजनाथ : राजकारणात आजपर्यंत प्रामाणिकपणे काम केल्यामुळे जनतेने मला डोक्यावर घेतले. राजकारणात कधीही दिखाऊपणा केला नाही, इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणूक जिंकणार, असे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी जाहीर केले. मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त जगमित्र कार्यालयासमोर अभिष्टचिंतन सोहळा गुरुवारी (ता. १५ जुलै) आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मंत्री मुंडे बोलत होते. (I Will win all upcoming elections : Dhananjay Munde)

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त जगमित्र संपर्क कार्यालयासमोर वाल्मिक कराड यांनी अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन केले होते. या वेळी व्यासपीठावर धनंजय मुंडे यांच्या मातोश्री रुक्मिणीबाई मुंडे, पत्नी राजर्षी मुंडे, अजय मुंडे, वाल्मिक कराड, मुलगी आदिश्री आदी परिवारातील सदस्य तसेच पदाधिकारी, नेते मंडळी उपस्थित होते. 

अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलताना मंत्री मुंडे म्हणाले की, वाढदिवस सोहळा कुठे साजरा करावा, हा प्रश्न होता. मुलगी वैष्णवी अमेरिकेत आहे, तिकडे जावे का. पण अमेरिकेत गेले तर १४ दिवस क्वारंटाइन व्हावे लागते, त्यापेक्षा आपल्या मायभूमीत कायमस्वरूपी क्वारंटाइन होण्यास तयार आहे. म्हणून इथेच वाढदिवस साजरा केला. स्वतःच्या जन्मावर स्वतःच काय बोलावे, हा प्रश्न आहे. जगात यापेक्षा कोणतेही अवघड काम नाही. 

हेही वाचा : विधान परिषद डोळ्यासमोर ठेवून जयंतरावांची सोलापुरात ही खेळी

मी राजकारण करत गेलो. अनेक सहकारी सोबत आले, मला नेता म्हणायला लागले. आमच्या राजकारणात प्रामाणिकपणा आहे; म्हणून लोकांनी डोक्यावर घेतले. दिखाऊपणा करु नका, असा संदेश कार्यर्त्यांना बोलताना दिला. अनेक निवडणुका लढलो आणि पडलोपण. पण, भविष्यात प्रत्येक निवडणूक जिंकणार आहे. तुमच्या विश्वासाने कोरोना काळात जिवंत ठेवले. समाजकारणात राजकारण केले नाही, समाजकारणच केले. समय के साथ बदलना होता है! काही जण म्हणाले, मनात राजकारण आणले नव्हते. पण, आता आणणार, हे मी जन्मादिवशी ठरवले आहे. सत्तेतील राजकारणात ज्याचा दोष नाही, त्याला दोष दिला जातो. हे माझ्या बाबतीत घडले आहे, अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करून दिली.

धनंजय मुंडे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेक झाला. राजे सिंहासनावर बसत असताना प्रत्येक पायरीवर एक अश्रू पडत होता. ते अश्रू स्वराज्यासाठी खस्ता खाललेल्यासांठी होते. इथेही मला माहिती आहे, मला इथपर्यंत पाठवण्यासाठी अनेकांनी खस्ता खालल्या आहेत. याची मला जाणीव आहे. ज्या काळात लोक शिव्या देत होते, त्यावेळी शरद पवार, अजित पवार यांनी मला विरोधी पक्षनेते पद दिले, हे मी कधीही विसरणार नाही.’’ 

परळी मतदारसंघातील प्रत्येकाचे उत्पन्न दुप्पट करणार आहे. परळी-आंबेजोगाई रस्ता, धर्मापुरी रस्ता केला. बायपास, एमआयडीसी आणली. आता मोठे उद्योग आणणार आहे. नगरपालिकेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. विकास हा जमिनीवर करावा लागतो, त्यामुळे भुयारी गटार योजनेच्या कामामुळे खड्डे झाले आहेत. पण विकासकामे तर करावे लागतील. परळी शहरात अभूतपूर्व काम करणार असल्याचे मंत्री मुंडे यांनी या वेळी जाहीर केले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख