माझ्यापेक्षा चांगलं काम करणाऱ्यांना उपसमितीचे अध्यक्षपद द्या : अशोक चव्हाण  - Give the chairmanship of the sub-committee to those who do a better job than me: Ashok Chavan | Politics Marathi News - Sarkarnama

माझ्यापेक्षा चांगलं काम करणाऱ्यांना उपसमितीचे अध्यक्षपद द्या : अशोक चव्हाण 

सरकारनामा ब्यूरो 
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर काही जण राजकारण करत आहेत.

जालना : मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर मी प्रामाणिकपणे काम करीत आहे. माझ्यापेक्षा दुसरा कोणी हे काम अधिक चांगले करील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाटले तर त्यांनी ते त्याला द्यावे. मराठा समाजाचा एक सहकारी म्हणून मी माझे काम सुरूच ठेवीन, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा आरक्षणासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. 

जालना येथे मंगळवारी (ता. 27 ऑक्‍टोबर) झालेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. ते म्हणाले की, मराठा आरक्षण रद्द झालेले नाही, तर सर्वोच्च न्यायालयाने त्याला अंतरिम स्थगिती दिली आहे. स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करावा लागणार आहे.

सुनावणी घटनापीठासमोर व्हावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात लेखी अर्ज केला आहे. मात्र, काही जण राजकारण करत आहेत. न्यायालयात बाजू मांडण्यासाठी मी जात नाही, तर ज्येष्ठ विधिज्ञ जातात, असा टोला त्यांनी याबाबत त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना लगावला. 

मराठा आरक्षणाला स्थगिती देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर जाऊन स्थगिती उठविण्याची मागणी करणे, हे उचित होणार नाही. त्यामुळे सुनावणी घटनापीठासमोरच व्हावी, अशी राज्य सरकारची भूमिका आहे. सात ऑक्‍टोबरला तशी मागणी सर्वोच्च न्यायालयात लेखी स्वरूपात करण्यात आलेली आहे, असे माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी नमूद केले. 

"राज्य सरकार मराठा आरक्षणावर गांभीर्याने काम करत असून काहीजण या प्रश्‍नावरही राजकारण करत आहेत. मराठा आरक्षणाचे एवढे गांभीर्य आहे तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल का केली नाही? नऊ ते दहा संघटनांनीही हस्तक्षेप याचिका दाखल केल्या आहेत. ही न्यायालयीन प्रक्रिया आहे. एका मर्यादेपुढे जाता येत नाही, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख