फडणवीस दर तीन महिन्यांनी भाजपचे सरकार येणार असे सांगतात : जयंत पाटील 

फडणवीस यांच्या सरकारचा पत्ता नाही. चार वर्षे कसे जातील, हे कळणार नाही.
Fadnavis say BJP government will come every three months : Jayant Patil
Fadnavis say BJP government will come every three months : Jayant Patil

औरंगाबाद : "महाराष्ट्रातील सरकार खाली ओढणार! असे दर तीन महिन्यांनी देवेंद्र फडणवीस म्हणतात, हे सांगितल्याशिवाय त्यांचेच सैन्य त्यांच्याबरोबर राहत नाही, ही खरी त्यांची अडचण आहे. "नाथा भाऊ' यांनी अशाच सगळ्या खोट्या, फसव्या आश्‍वासनाला कंटाळून पक्षाचा त्याग केला. पुढच्या काळात आणखी काही लोक भाजपमधून बाहेर जाताना दिसतील. आपले सरकार येणार, असे सांगत सांगत आता एक वर्षे सरले. पण, फडणवीस यांच्या सरकारचा पत्ता नाही. चार वर्षे कसे जातील, हे कळणार नाही,' असा सणसणीत टोला "राष्ट्रवादी'चे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी औरंगाबादेत लगावला. 

पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज (ता. 12 नोव्हेंबर) उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्‌घाटनाप्रसंगी ते बोलत होते. 

ते म्हणाले, "महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे बळकट सरकार काम करीत आहे. आमची गती कोरोनामुळे थोडी कमी झाली, देशातही हीच स्थिती आहे. केंद्र सरकारने आता कोरोनाची मदत कमी केली. त्यामुळे प्रश्‍नांवर मार्ग काढताना काही अडचणी येत आहेत. पण ती कसर येत्या काळात भरुन काढायची आहे.' 

विनाअनुदानित तत्वावरील शाळांच्या प्रश्‍नांची सोडवणुकीसाठी सरकारने प्रयत्न केल्याचे ते म्हणाले. सतीश चव्हाण यांनी केवळ औरंगाबादचेच नव्हे; तर पदवीधर, शिक्षकांच्या विकासासाठीचे अनेक प्रश्‍न त्यांनी सोडविले. सन 2008 व 2014 ला चव्हाण यांनी विजय मिळविला. लाटेतही चव्हाण यांनी 2014 ला पहिल्या पसंतीची 54 टक्के मत मिळवून विजय मिळविला. 

विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. 70 ः 30 या समीकरणामुळे मराठवाड्यातील सहाशे विद्यार्थ्यांनाच वैद्यकीय प्रवेश मिळत होता. परंतु ही प्रथा सतीश चव्हाण यांनी मोडीत काढल्याने आता बाराशे जणांना प्रवेश मिळतो. राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा प्रश्‍न, कृष्णा खोरे, नाशिकच्या धरणातून पाणी सोडण्याचा विषयांवरही चव्हाण यांनी सभागृहात आक्रमकपणे बाजू मांडल्याचे ते म्हणाले. 

या वेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पर्यावरण व पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार विक्रम काळे, प्रदीप जैस्वाल, अंबादास दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडेले आदींची उपस्थिती होती. 

भाजपचा खरा चेहरा समोर 

सामान्यांच्या नजरेत भाजपचा खरा चेहरा समोर आला. त्यामुळे शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार स्थापन व्हावे ही जनभावना झाली. शिवसेनेच्या नेतृत्वात कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार चालविले जात आहे. जोमाने सरकारने सुरुवात केली. गत पाच वर्षांत सामान्य माणूस बेरोजगार, शेतकरी भरडला गेला, त्यांच्यासाठी उपाययोजना काढताना कोरोनाने आघात केला. परिणामी व्यवहार ठप्प झाले व आर्थिक संकटे आली, आव्हाने समोर आली. त्यातून आपण मार्ग काढीत असल्याचे ते म्हणाले. 
 
प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन

पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज (ता. 12 नोव्हेंबर) अखेरच्या दिवशी सकाळच्या सत्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज भरला. 

या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी तसेच कॉंग्रेस व शिवसेनेचे पदाधिकारी, मंत्री व आजी माजी आमदार उपस्थित होते. त्यानंतर ढोल ताशाच्या गजरात आकाशवाणी येथील बिग बाजार कॉम्प्लेक्‍स येथे प्रचार कार्यालयाचे उद्धघाटन करण्यात आले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com