खबरदार, शेतकऱ्यांना बॅंकेच्या नोटिसा पाठवल्या तर... : फडणवीस गरजले  - Fadnavis said that to bank attention if you are sending notices to farmers ...: | Politics Marathi News - Sarkarnama

खबरदार, शेतकऱ्यांना बॅंकेच्या नोटिसा पाठवल्या तर... : फडणवीस गरजले 

महेश जगताप 
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही ती नाही. पण कमीत कमीत नोटिसा तर पाठवणे बंद करावे.

पुणे : शेतकऱ्याने बॅंकेची आलेली नोटीस दाखवली आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी "खबरदार जर आशा संकटाच्या वेळी शेतकऱ्यांना बॅंकेच्या नोटीसा पाठवल्या तर...' असा दम राज्य सरकारला भरला. 

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या उस्मानाबाद, लातूर या भागाचा देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता. 20 ऑक्‍टोबर) पाहणी दौरा केला. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना धीर देत त्यांनी संवाद साधला. 

दौऱ्यावर असताना एका शेतकऱ्याने देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आपली कैफियत मांडली. पावसाने आम्हाला रस्त्यावर आणलं आहे. चार घर पूर्णपणे पडली आहेत. घरातील होतं नव्हतं ते सगळं खराब होऊन गेले आहे. नुकतेच काढून ठेवलेले सोयाबीन पावसाने भिजून नुकसान झाले आहे. आता त्याला मार्केटमध्ये कोण घेणार? गेल्या वर्षीही शेतात काही पिकलं नाही. या वर्षी तर शेतात चार ते पाच हजार खर्च झाला आहे. आत्ता शेतातून मिळकत तर नाहीच; पण झालेला खर्चसुद्धा कर्ज काढून केला होता. 

गेल्या काही दिवसांपासून बॅंक कर्ज वसुलीची नोटीस पाठवत आहे. सांगा साहेब तुम्ही आम्ही जगायचं कसं, असा प्रश्न शेतकऱ्यांनी फडणवीस यांना केला. 

या वेळी फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका करताना अशा संकटाच्या काळी बॅंकेच्या शेतकऱ्यांना नोटिसा येणे अतिशय निंदनीय आहे. बॅंकेला सरकारने अशा कोणत्याही नोटीसा पाठवू नयेत, असे आदेश द्यावेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही ती नाही. पण कमीत कमीत नोटिसा तर पाठवणे बंद करावे, असा टोलाही त्यांनी राज्य सरकारला लगावला. 

देवेंद्र फडणवीस यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीचे आणि पिकाचे किती नुकसान झाले आहे, याची पाहणी केली. ते काल सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. आज उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन झालेल्या नुकसानीचा त्यांनी आढावा घेतला. 

Edited By Vijay Dudhale
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख