पंतप्रधानही मला टाळत नाहीत, मग फडणवीसांचे काय? - Even the Prime Minister does not avoid visiting me, so what about Fadnavis? | Politics Marathi News - Sarkarnama

पंतप्रधानही मला टाळत नाहीत, मग फडणवीसांचे काय?

दत्ता देशमुख
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

एक खासदार म्हणून नाही तर छत्रपती घराण्याचा वारस म्हणून आपण दौऱ्यावर आहोत. छत्रपतींचा वारस म्हणून लोकांच्याही खुप अपेक्षा आहेत. त्यामुळेच लोक मोठ्या अपेक्षेने जवळ येत आहेत.

बीड : पंतप्रधानही मला अपॉईंटमेंट देण्यास  टाळत नाहीत, मग फडणवीसांचे काय? फडणवीसांकडेही वेळ मागितली, पण ते बिहारला जाणार आहेत, त्यामुळे त्यांची भेट होऊ शकणार नाही. छत्रपती घराणे मोठे आहे. त्याचा मान तर आहेच शिवाय आपण कधीही व्यक्तीगत काम व लाभासाठी जात नाही. सामान्यांच्या कामांसाठी वेळ व भेट मागत असतो, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

संभाजीराजे छत्रपती यांनी मंगळवारी गेवराई तालुक्यातील नांदुरहवेली, कुंभारवाडी, सावरगाव, कोळगाव, तांदळा आदी गावांत पीक नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर बीडमध्ये पत्रकारांशी बोलतांना संभाजीराजे छत्रपती म्हणाले, शेतकऱ्यांना मदत करणे प्रथमदर्शनी राज्याची जबाबदारी आहे. कोरोनामुळे अडचण आहेच ,पण शेतकऱ्यांना वाचवावे लागेल. यात केंद्र सरकारनेही लक्ष घातले पाहीजे. आपला पाहणी दौरा राजकारण विरहीत असून शेतकऱ्यांचे प्रश्न, व्यथा जाणून घेण्यासाठी आहे. दौरा झाल्यानंतर आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत.

राज्याचे केंद्राकडे पैसे असतील तर ते मिळण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यावा,आपणही सोबत आहोत. दरम्यान, मागच्या तीन दिवसांपासून मराठवाड्यातील अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करत आहे. एक खासदार म्हणून नाही तर छत्रपती घराण्याचा वारस म्हणून आपण दौऱ्यावर आहोत. छत्रपतींचा वारस म्हणून लोकांच्याही खुप अपेक्षा आहेत. त्यामुळेच लोक मोठ्या अपेक्षेने जवळ येत असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी नमूद केले.

शेतकऱ्यांचे प्रश्न, व्यथा सांगण्यासाठी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना वेळ मागीतली आहे. मात्र, फडणवीस बिहार दौऱ्यावर जात असल्याने त्यांची भेट होणार नाही, असे संभाजीराजे यांनी सांगितले.

Edited By :Jagdish Pansare

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख