रणजितसिंह डिसलेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्या : यांनी केली मागणी 

डिसले यांनी महाराष्ट्राची मान संपूर्ण जगात उंचावली आहे.
Demand for Maharashtra Bhushan Award to Ranjit Singh Disle
Demand for Maharashtra Bhushan Award to Ranjit Singh Disle

नांदेड : महाराष्ट्राच्या मातीत रूजलेले संस्कार व शिक्षण याची अनुभूती संपूर्ण जगाला देणारे सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी महाराष्ट्राची मान संपूर्ण जगात उंचावली आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करावे, अशी मागणी नांदेडचे माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

दरम्यान, अशीच मागणी शिवसेनेचे आमदार ज्ञानेश्‍वर चौगुले यांच्या कन्या स्टुडन्ट हेल्पिंग युनिटच्या अध्यक्षा आकांक्षा चौगुले यांनीही केली आहे. 

सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना नुकताच आंतरराष्ट्रीय पातळीवर ग्लोबल टीचर प्राईज हा सन्मान मिळाला आहे. सन्मानचिन्हासह सात कोटी रुपयांची रक्कम त्यांना पुरस्काराच्या रूपाने मिळणार आहे. शिक्षण क्षेत्रात खास करून मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेले कार्य गौरवास्पद आहे.

महाराष्ट्राच्या या सुपुत्राने देशासह जागतिक पातळीवर राज्याचे नाव अजरामर केले आहे. पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी निम्मी रक्कम त्यांच्यासोबत अंतिम फेरीत आलेल्या स्पर्धकांना शैक्षणिक कामासाठी प्रदान करण्याचा मनाचा मोठेपणा त्यांनी दाखविला आहे. त्यांच्या या कृतीतून महाराष्ट्राच्या मातीत रुजलेले संस्कार व शिक्षणाचे महत्व अधोरेखित होते.

अशा या शिक्षकास महाराष्ट्र भुषण पुरस्कार देऊन गौरविल्यास अभिजात गुणसंपन्न शिक्षकाचा गौरव केल्याचे समाधान महाराष्ट्रातील जनतेला मिळेल, असेही सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे. 

शिवसेना आमदार ज्ञानेश्‍वर चौगुले यांच्या मुलीनेही मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून डिसलेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पोपटराव पवार यांना घेऊन हिवरे बाजारच्या धर्तीवर आदर्श गाव संकल्पना संपूर्ण राज्यभर तत्कालीन आघाडी सरकारने राबवली. त्याच धर्तीवर युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा "ग्लोबल टीचर प्राईज' पुरस्कार मिळवणारे रणजितसिंह डिसले यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने "शिक्षण सुधारणा समिती' स्थापन करावी. त्याद्वारे प्रत्येक वर्षी 1000 शिक्षकांना प्रशिक्षण द्यावे. जेणेकरून पालकांचा खासगी शिक्षण संस्थांकडील कल कमी होईल आणि सोबतच सरकारी शाळेचा शैक्षणिक दर्जाही उंचावेल.

राज्य सरकारने राज्यातील सर्वोच्च "महाराष्ट्र भूषण' पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करावे. त्यामुळे एकट्या डिसेल गुरुजींचा सन्मान होणार नाही तर राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांचा सन्मान होणार आहे, असे स्टुडन्ट हेल्पिंग युनिटच्या अध्यक्षा आकांक्षा ज्ञानराज चौगुले यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com