भाजपने मुंडेंना सन्मानाने पद द्यावे अन पंकजांनीही ते घ्यावे 

भाजपच्या आताच्या सर्व नेत्यांमध्ये पॉवरफुल कोणीही असले तरी मास लिडर पंकजा मुंडे आहेत. त्यांचे समर्थक अनेक जिल्ह्यांत आहेत. त्याचा परिणाम दिसलेला आहे आणि भविष्यातही दिसू शकतो. त्यामुळे आता पक्ष व मुंडे या दोघांनीही झाले गेले गंगेला मिळाले म्हणावं आणि साथ साथ चलावं, अशी वेळ आली आहे.
BJP should give the post to Munde with respect and Pankaj should also take it
BJP should give the post to Munde with respect and Pankaj should also take it

बीड : रंग पाहण्यासाठी असतो, पिण्यासाठी नाही अशी गावखेड्यातली जुनी म्हण आहे. तसे भारतीय जनता पक्षामधील नेत्यांनी व पंकजा मुंडे यांनी एकमेकांचे रंग पाहिले आहेत. पण, आता वेळ आली आहे, "झाले गेले विसरण्याची आणि पुन्हा साथ साथ चालण्याची.' तसे हा फॉर्म्युला दोघांच्याही हिताचा आहे. 

पंकजा मुंडे यांनी 2014 ची विधानसभा निवडणूक तोंडावर असताना राज्यात संघर्ष यात्रा काढली होती. यात्रेला ठिकठिकाणी मोठा प्रतिसादही मिळाला. मात्र, त्याच पंकजा मुंडे आणि पक्षाचा वरदहस्त असलेल्या भाजप नेत्यांमध्ये दरी पाडण्यासाठी एक वर्ग सक्रीय झाला. योगायोगाने सत्ता आली, पंकजा मुंडे यांना महत्वाची खातीही मिळाली. पण, तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंकजा मुंडे यांच्यात जाणिवपूर्वक दुरावा तयार करून वाढविण्याचे प्रयत्न झाले. 

पंकजा मुंडे या लोकनेत्या असल्याने त्यांच्याबद्दल नेतृत्वाच्या मनात भीती निर्माण केली जाऊ लागली. त्यातूनच त्यांच्याकडील खाती कमी करणे, खात्याला त्यांच्या मर्जीविरुद्धचा प्रधान सचिव देणे, असे प्रकार घडले. तसे, टाळी एका हाताने नाही, तर दोन्ही हाताने वाजवली जाते. 

दरम्यान, पंकजा मुंडे यांचा परळीतून पराभव झाला. पुढेही ही दरी कमी होण्याऐवजी वाढतच गेली आणि आणखीही वाढतच आहे. तसे, ही ओढाताण एका बाजूने नाही, तर दोन्ही बाजूने आहे. अलिकडच्या काळात भाजप व पंकजा मुंडे यांच्यातील घटना अख्खे राज्य पाहतच आहे. पण, झाले ते पुरे म्हणण्याची वेळ आल्याचे सद्यस्थितीवरुन दिसते. 

आजघडीचे वास्तव पाहिले तर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना दिल्लीचा आशीर्वाद आहे. पण, पंकजा मुंडे यांनाही लोकांमध्ये स्थान आहे. भाजपच्या राज्यभरातील नेत्यांची यादी काढल्यानंतर फक्त नावावर लोक जमा करण्याची ताकद असणाऱ्यांमध्ये पंकजा मुंडे आहेत. दिल्लीच्या आशीर्वादावर जरी पंकजा मुंडे यांना डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला जात असला तरी भविष्यात त्याचा फटका भाजपलाही बसणार आहे. 

अगदी अलिकडचे सरकार विरुद्ध आवाज उठविण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप नेत्यांना नेटकऱ्यांनी इतके फटकारले की काहींना त्यांचे लाइव्ह काढून टाकावे लागले. आंदोलनाचीही वेगळी गत नाही. एकूणच जरी पक्ष मोठा असला तरी पंकजा मुंडे यांना बाजूला ठेवण्यामुळे सरकार विरुद्ध धार तयार होत नाही, असेही चित्र आहे. 

आगामी दोन वर्षांनी नगर पालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. बीडसह, नगर, नाशिक, बुलडाणा, औरंगाबाद, परभणी, नांदेड, पुणे अशा राज्यातील अनेक जिल्ह्यांत त्यांना व्यक्तीगत मानणारा मोठा वर्ग आहे. 

सरकार विरुद्धच्या आवाजात जोर निर्माण करण्यासाठी त्यांच्या सोबत असण्याचा भाजपला निश्‍चितच फायदा होईल, यात शंका नाही. भविष्यातील निवडणुकींतही पक्षाला ताकद मिळेल. त्यामुळे दोघांनीही कामापुरती ओढाताण केली. मात्र, चंद्रकांत पाटील यांच्या घोषणेप्रमाणे आता त्यांना सन्मानाने केंद्रात स्थान द्यावे आणि त्यांनीही ते आनंदाने घ्यावे, अशी दोघांच्याही हिताची ही वेळ आहे. 

Edited By :Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com