'औरंगाबाद पदवीधर' मध्ये बच्चू कडूंची ताकद प्रा. सचिन ढवळेंच्या पाठीशी 

प्रहार जनशक्ती पक्षाने आणि प्रा. ढवळे यांनी ही निवडणूक संपूर्ण ताकदीने लढण्याचा निर्धार केला आहे.
Aurangabad graduate constituency, from Bachchu Kadu's party, Pvt. Sachin Dhawale's candidature
Aurangabad graduate constituency, from Bachchu Kadu's party, Pvt. Sachin Dhawale's candidature

पुणे : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून प्रहार जनशक्ती पक्षाकडून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. सचिन ढवळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकाच्या भूमिकेतून अवघ्या पदवीधारांना जगण्याचे बळ देणाऱ्या प्रा. ढवळे यांच्या पाठीशी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी "प्रहार'च्या माध्यमातून आपली ताकद उभी केली आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असण्याचा फायदा प्रा. ढवळे यांना मिळेल, अशी चर्चा आहे. 

प्रहारचे जनशक्तीचे सर्वेसर्वा राज्यमंत्री बच्चू ऊर्फ ओमप्रकाश कडू यांच्या उपस्थितीत पक्षाची मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत प्रा. ढवळे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानुसार प्रा. ढवळे यांनी 11 नोव्हेंबर रोजी औरंगाबाद विभागीय आयुक्तालयात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

प्रा. ढवळे यांनी पदवीधरांच्या अनेक प्रश्नांना वेळोवेळी वाचा फोडण्याचे काम केले आहे. यामध्ये स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा महापोर्टलचा विषय असो वा कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षकांचा प्रश्न, प्राध्यापक भरती, तासिका वेतन (सीएचबी) निश्‍चिती, संगणक शिक्षकांचे प्रश्‍न यांसारख्या प्रलंबित प्रश्नांसाठी त्यांनी वेळोवेळी लढा देऊन सरकारला धारेवर धरले आहे. विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचाही प्रयत्न केला. 

प्रा. ढवळे यांनी विद्यार्थी हितासाठी वेळोवेळी विविध उपक्रम राबवून तसेच अनाथ, अपंग, निराधार यांच्यासाठी विविध योजना स्वःताच्या पुढाकारातून राबविल्या आहेत. या सर्व गोष्टींमधून त्यांनी पदवीधर आणि समाजाप्रती असलेली तळमळ दाखवून दिली आहे. तसेच, जागतिक महामारी कोरोनामुळे लॉकडाउनच्या काळात शहरांमध्ये विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय, तसेच अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी मोफत बस व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. 

संपूर्ण राज्यात मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरे, अनाथ, अपंग, खेळाडू व वंचित घटकातील प्रत्येकाला न्याय मिळावा, यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यातून त्यांची विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रियता वाढत गेली. त्यांच्या कामाची दखल घेत पदवीधारांच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी, यासाठी त्यांना प्रहार जनशक्ती पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. 

सद्यस्थितीत तरुणाईचे बेरोजगारीसह व इतर अनेक प्रश्नांनी कंबरडे मोडले आहे. नोकरीअभावी अनेकांना पडेल ते काम करावे लागत आहे. पदवीधरांच्या या प्रश्नांना वाचा फोडण्याचे प्रा. ढवळे यांनी केले आहे. समाजहितासाठी झटणाऱ्या प्रा. ढवळे यांना पदवीधर तरुणांनी निवडणूक द्यावे, असे आवाहन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले आहे. 

प्रा. ढवळे यांच्या उमेदवारीस सामाजिक, शैक्षणिक विभागात कार्यरत असणाऱ्या विविध राजकीय, शिक्षक संघटना आणि खासगी कोचिंग क्‍लास असोसिएशन आदींनी जाहीर पाठिंबा दिला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाने आणि प्रा. ढवळे यांनी ही निवडणूक संपूर्ण ताकदीने लढण्याचा निर्धार केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com