मेटे ब्लॅकमेलिंग करणारे, तर क्षीरसागर जमिनी हडपणारे : समर्थकांची चिखलफेक 

आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील सत्ता असलेल्या पंचायत समितीमधील रोहयोतील 15 कोटी रुपयांच्या अनियमिततेबद्दल विनायक मेटे यांनी तक्रार केली. या प्रकरणी तिघांची सेवा समाप्ती करुन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्याच मुद्द्यावरून आता सोशल मीडियावर त्यांच्या समर्थकांमध्ये युद्ध पेटले आहे.
Vinayak Mete- Sandeep Kshirsagar's supporters clashed on social media
Vinayak Mete- Sandeep Kshirsagar's supporters clashed on social media

बीड : बीडमध्ये कोरोनाचा कहर सुरू असताना शिवसंग्रामचे अध्यक्ष, आमदार विनायक मेटे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या समर्थकांमध्ये चांगलेच युद्ध पेटले आहे. अगदी दलाल, शिखंडी अशा शेलक्‍या अस्त्रांचा या युद्धात वापर होत आहे. विशेष म्हणजे दोघांचे समर्थक नुसती एकमेकांची उणीदुणीच नाही, तर कुळमूळही उकरली जात आहेत. आणखी कोण कोणाचे काय काय बाहेर काढणार आणि बीडकरांना दाखविणार, हे पहावे लागणार आहे. 

आमदार झाल्यानंतर राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर यांनी बीड पंचायत समितीवरील विनायक मेटे यांची सत्ता उलथवून टाकली. त्यानंतर मेटे यांनीही पंचायत समितीमध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत अनियमिता झाल्याची तक्रार जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर 14 कोटी 80 लाख रुपयांची कामे कामे अनियमितपणे ऑनलाइन केल्याचे समोर आले. यावरुन सुरुवातीला तिघांची सेवासमाप्ती करुन गुन्हाही नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणात मेटे यांनी सत्ताधारी आमदार आणि पंचायत समितीचे पदाधिकारी सहभागी असल्याचा आरोप करत विभागीय आयुक्तांकडे पुन्हा तक्रार केली. यावरुन गुन्ह्याची व्याप्ती वाढत आणखी काही नावे आरोपींमध्ये सामाविष्ट झाली आहेत. याच मुद्द्यावरुन आता मागच्या तीन दिवसांपासून मेटे-क्षीरसागर या दोघांच्या समर्थकांमध्ये सोशल मीडियावर आणि पत्रकयुद्ध रंगले आहे. 

ज्यांना कधी जनतेतून निवडून येता आले नाही, अशा आमदार विनायक मेटेंनी दलाली आणि टक्केवारीवर समाजाच्या नावावर दुकानदारी करत राजकारणातली मुंबई गाठल्याचा आरोप संदीप क्षीरसागर यांचे समर्थक भाऊसाहेब डावकर यांनी केला. त्यांच्या ताब्यात पंचायत समिती असताना रोहयो, स्वच्छतागृह इतर घोटाळे झाले. अगदी आरोप करताना अभ्यास कच्चा असल्याचाही टोला त्यांनी लगावला. 25 वर्षांत काय दिवे लावले? मांडवली केली, मजुरांच्या नावाने पैसे खाल्ले, दलाली केली, असे आरोप करत मागच्या दाराने प्रवेश मिळवतात, हे खरे आहे का? असा सवालही डावकर यांनी केला.

अगदी शिवसंग्राम भवनाची जागा ब्लॅकमेलिंग करून कशी मिळविली, हे बीडकरांना माहीत असल्याचाही गंभीर आरोप केला. राजकीयद्वेष भावना मनात ठेवून आरोप करायचे, कोणी कानात सांगितले की सेटलमेंटचा विचार डोक्‍यात ठेवून तक्रारी करायच्या, असे विचार डोक्‍यात असतात, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे. 

या पत्रकाने संतापलेल्या शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे यांनीही मग पंचायत समितीत जनतेच्या 17 कोटी रुपयांवर हात साफ करण्याच्या उद्देशावर पाणी फिरल्याने बीडचा भ्रष्टाचारी म्होरक्‍या पिसाळल्यागत वागत आहे. शिखंडीला पुढे करून भ्रष्टाचाऱ्याने सतीसावित्रीचा आव आणू नये. स्वीय सहायकाच्या नावांनी गुन्हा नोंद होत असले तर यात या भ्रष्टाचारी म्होरक्‍याचा किती हात आहे, हे संबंध राज्याला माहित झाल्याचे काकडे म्हणाले.

आतापर्यंत फक्त पंचायत समितीमधील भ्रष्टाचाराची प्रकरणे काढली असून यापुढे बाहेरची प्रकरणे देखील जगासमोर आणू, असे म्हटले आहे. कुशलच्या नावावार कोट्यवधी रुपये बुडाखाली घातले, 25/15, दलित वस्ती, रमाई घरकुलच्या नावावर टक्केवारी घेतली, ती देखील सोडणार नाहीत असे म्हटले आहे. रात्रीत झिंगनाऱ्यांनी आम्हाला काही सांगायचे काय काम करू नये, आपला धनी कसा आहे, त्याचीच चाकरी इमानेइतबारे करावी, असा सल्लाही काकडे यांनी दिला. 

शिखंडीच्या खांद्यावर बंदूक ठेऊन चालण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर येऊन बोलावे, असे आव्हानही त्यांनी दिले. 

शिवसंग्राम भवन जागा रितसर कर्ज काढून घेतल्याचा खुलासा करत तुम्हीच कुणाची जमीन, बंगला, जागा, मोकळे मैदान, डोंगर, शेती हडपली आहे, याची यादीच आता वाचणार असून त्यासाठी तयार राहा. कारखाना अवसायनात काढल्यानंतर सुद्धा बेकायदेशीर पद्धतीने औरंगाबादचे फ्लॅट विकले, रेल्वेच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी हडपल्या, गुत्तेदारीमधील पार्टनरशिप हे आता जनतेसमोर आणणार असून डॉक्‍टर गुत्तेदारासोबतची पार्टनरशिप देखील समोर आणणार असल्याचे सुधीर काकडे यांनी म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com