लव्ह औरंगाबादचा डिस्प्ले बोर्ड अज्ञातांनी फोडला - Tension in Aurangabad as Smart City Board vandalized | Politics Marathi News - Sarkarnama

लव्ह औरंगाबादचा डिस्प्ले बोर्ड अज्ञातांनी फोडला

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 22 डिसेंबर 2020

शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडावी या हेतूने स्मार्ट सिटी अंतर्गत लावण्यात आलेल्या डिस्प्ले बोर्ड वरून आता शहरात वादंग निर्माण होत आहे. औरंगाबाद शहराच्या इतिहासकालीन नावांची माहिती नवीन पिढीला व्हावी, या उद्देशाने लावण्यात आलेल्या डिस्प्ले बोर्ड वरून आज शहरात राडा झाला. 

औरंगाबाद : शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडावी या हेतूने स्मार्ट सिटी अंतर्गत लावण्यात आलेल्या डिस्प्ले बोर्ड वरून आता शहरात वादंग निर्माण होत आहे. औरंगाबाद शहराच्या इतिहासकालीन नावांची माहिती नवीन पिढीला व्हावी, या उद्देशाने लावण्यात आलेल्या डिस्प्ले बोर्ड वरून आज शहरात राडा झाला. 

छावणी भागातील नेहरूपुतळ्या जवळ लावलेला लव्ह औरंगाबादचा डिजिटल बोर्ड अज्ञातांनी रात्री फोडून टाकला. यावरून आता राजकारण तापण्याची शक्यता आहे. औरंगाबाद शहरात प्रमुख चौकांमध्ये लव्ह औरंगाबाद,लव्ह खडकी, लव्ह प्रतिष्ठान,असे डिस्प्ले बोर्ड महापालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत लावण्यात आले आहेत. याशिवाय महापालिकेच्या काही जागा खाजगी व्यक्तींना सुशोभीकरणासाठी देण्यात आल्या आहेत. 

परंतु या डिस्प्ले बोर्ड आणि सेल्फी पॉईंटवरून वेगळेच राजकारण सुरू झाले आहे. शिवसेनेने 'लव्ह औरंगाबादला', 'सुपर संभाजीनगर',चा डिस्प्ले बोर्ड टीव्ही सेंटर भागात लावून प्रतिउत्तर दिले आहे. यावरून एमआयएमचे खासदार इमतियाज जलील यांनी नुकताच शिवसेनेवर निशाणा साधला होता. महापालिका निवडणुकीत शिवसेनेकडून नेहमीच संभाजीनगरचा वापर राजकारणासाठी केला जातो असा आरोप त्यांनी केला होता.

यावरून शिवसेना विरुद्ध एमआयएम असा कलगीतुरा रंगलेला असतानाच काल छावणी भागातील नेहरू पुतळ्याजवळ लावण्यात आलेला लव्ह औरंगाबादचा डिस्प्ले बोर्ड अज्ञातांनी फोडला. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर या ठिकाणी मोठी गर्दी जमा झाली होती. या घटनेची माहिती कळताच छावणीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन याबद्दल तक्रार दाखल केली आहे.

Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख