हा कोण गबरू आहे...? असला कसला हा गबरू आहे...तो अजून कसा सापडेना?  - Suresh Dhas criticizes Sanjay Rathore over Pooja Chavan's death case | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्र्यांकडून 5 हजार 400 कोटींचे पॅकेज जाहिर...
पुढील 15 दिवस संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार...
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू ठेवणार...
नोंदणीकृत घरगुती कामगारांनाही आर्थिक मदत देणार...
नोंदणीकृत फेरीवाल्यांनाही पंधराशे रुपयांची मदत मिळणार...
परवानाधारक रिक्षाचालकांना पंधराशे रुपये देणार...
पुढील महिनाभर गरीबांसाठी मोफत शिवभोजन थाळी...दोन किलो तांदूळ, तीन किलो गहू मिळणार
राज्यात उद्या रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी...मुख्यमंत्र्यांची घोषणा

हा कोण गबरू आहे...? असला कसला हा गबरू आहे...तो अजून कसा सापडेना? 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 4 मार्च 2021

आम्हीही बीडचेच असून हे 2018 पासून चाललेले आहे, असं आम्ही ऐकतोय. 

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणावरून भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी विधान परिषदेतील चर्चेदरम्यान महाविकास आघाडी सरकारला चांगलेच झोडपले. "त्या ऑडिओ क्‍लिपमधील आवाज पूजा चव्हाण हिचाच असल्याचे राज्यातील लहान मूलही सांगतं. शोले चित्रपटातील गब्बरही शेवटी त्या ठाकूरला सापडला. पण, राज्यातील हा गबरू कोण आहे? तो अजून कसा सापडेना. किती दिवस झाले हा गबरू सापडत नाही. नेमका असला कसला हा गबरू आहे आणि तो कोण गबरू आहे? गबरू, गबरूशेठ हे आम्ही फक्त क्‍लिपद्वारेच ऐकतो. याचं उत्तर आम्हाला मिळायलं पाहिजे,'' असे म्हणत धस यांनी माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर हल्लाबोल केला. 

सुरेश धस म्हणाले की, पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात तुमच्या सरकारची काय... गेली, ते काय सांगावे. एखाद्या समाजाचा आधार घेऊन आमच्या पाठीमागे समाज आहे, आम्ही काहीही करायचं? असं कसं चालेल. आम्हीही बीडचेच असून हे 2018 पासून चाललेले आहे, असं आम्ही ऐकतोय. 

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणाने काही नवीन पायंडे पाडले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील एका सन्मानीय सदस्याने आमुक आमुक आगे बढो म्हणून मोर्चा काढला. फुले-शाहू-आंबेडकर यांचे नाव घेता आणि कोणाला पाठिंबा देता? त्या मोर्चातील महिला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांना शिव्या देत होत्या? एखाद्या समाजाचा आधार घेऊन आमच्या पाठीमागे समाज आहे. आम्ही काहीही करायचं? असं कसं चालेल, असा सवालही आमदार सुरेश धस यांनी उपस्थित केला. 

मोर्चा काढून देवेंद्र फडणवीस यांना शिव्या देणे, हे योग्य नाही. ज्या सन्मानीय सदस्याने हा मोर्चा काढला होता, त्यांनी हे नवीन पायंडे पाडल्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्कार दिला पाहिजे. यामागची त्यांची मानसिकता समजून घेतली पाहिजे. प्रसार माध्यमांतील वृत्तांकनाबद्दल नाराजी व्यक्त करत राज्यात यापुढे असे गबरूशेठ पुन्हा होऊ देऊ नका, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले. 

धनंजय मुंडेंचं प्रकरण आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे 

बीडच नावही आंतरराष्ट्रीय पातळीवर गेलं पाहिजे. कारण अगोदर एक प्रकरण आलं, तेसुद्धा बीड जिल्ह्याचच होतं. (तेवढ्यात खालून कोणीतरी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं.) आम्ही त्यांच्याबद्दल (धनंजय मुंडे) म्हणत नाही. धनंजय मुंडे साहेबांचं प्रकरण वेगळं आहे. त्याच्यावर आम्ही बोलणार नाही. हे आम्ही बीड जिल्ह्याचे म्हणून स्पष्टपणे सांगतो. कारण, ते प्रकरण आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे, त्यामुळे आम्ही त्याच्यावर बोलणार नाही, असे सांगून भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी विधान परिषदेतील चर्चेदरम्यान धनंजय मुंडे यांचे प्रकरण उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख