शिवसैनिकांना मान्य नसलेली युती सरनाईकांनी बोलून दाखवली!

भाजपच्या काही नेत्यांनाही ही युती व्हावी, असे वाटत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची अनैसर्गिक युती सर्वसामान्य शिवसैनिकाला मान्य नाही.
 Raosaheb Danve .png
Raosaheb Danve .png

जालना : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक  (Pratap Saranaik) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लिहिलेल्या पत्रावरून राज्यातील राजकारण तापले आहे. या पत्रामुळे पुन्हा एकदा भाजप व शिवसेनेच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे. भाजपच्या काही नेत्यांनाही ही युती व्हावी, असे वाटत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची अनैसर्गिक युती सर्वसामान्य शिवसैनिकाला मान्य नाही. तीच भाषा प्रताप सरनाईकांनी त्यांच्या पत्रातून बोलून दाखवली आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी दिली. (Raosaheb Danve's reaction to Pratap Saranaik's letter) 

दानवे जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना फोडत असल्याचा आरोप केला. मात्र, त्याआधी शिवसेनेने स्वतःकडे पाहिले पाहिजे. केंद्रीय तपास यंत्रणांकडे संशयाने पाहू नये, असेही दानवे यांनी सांगितले.  

सरनाईक यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, भाजपशी युती केल्यावर शिवसेनेला फायदा होईलच. शिवाय आमच्या सारख्यांना होणारा त्रासही वाचेल, सरनाईक यांनी ठाकरे यांना दोन पानी पत्र लिहून महाविकास आघाडीतील मित्र पक्षांवरच तोफ डागली आहे. राष्ट्रवादी-काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत आहेत. आपला पक्ष कमकुवत होत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे. त्यामुळे सरनाईक, परब, वायकर या सहकाऱ्यांना होत असलेला नाहक त्रास थांबेल, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, भाजप खासदार गिरीष बापट म्हणाले, भाजप कोणतीही कारवाई करत नाही. भाजप गरीब पक्ष असून लोकांना मदत करणारा पक्ष आहे. सरनाईक यांनी भीतीच्या पलीकडे आणि सुरक्षेच्या दृष्टीने बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. भविष्यात अशा गोष्टी होऊ शकतात. आमची युती अनैसर्गिक आघाडीमुळे तुटली होती. भविष्यात युती होऊ शकते. आम्हाला त्याचा आनंद होईल, असे बापट यांनी सांगितले. 

सरनाईक आता जे बोलत आहेत, ते भाजपचे नेते महाविकास आघाडी सरकार होण्याआधीपासूनच बोलत होते. सरनाईक यांच्या पत्राचा त्यांचे नेते सकारात्मक विचार करतील. यावर त्यांच्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना निर्णय घ्यायचा आहे, असेही बापट म्हणाले. 

पालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला प्राधान्य

पुढील वर्षी राज्यात मुंबईसह पुणे, पिंपरी चिंचवड व अन्य काही महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. तर शिवसेना व राष्ट्रवादीच्या आघाडीची चर्चा आहे. त्यातच सरनाईक यांच्या पत्रामुळे भाजप व शिवसेनेच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे. यावर बोलताना बापट यांनी पालिका निवडणुकीत शिवसेनेशी युतीलाच प्राधान्य असेल, असे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस हा पश्चिम महाराष्ट्रातील छोटा पक्ष आहे. तो अखिल भारतीय पक्ष नाही. या पक्षापेक्षा शिवसेनेला प्राधान्य राहील, असा टोलाही बापट यांनी लगावला.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com