मराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानावर मोर्चा - Maratha Morcha on Residence of Ashok Chavan in Nanded | Politics Marathi News - Sarkarnama

मराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानावर मोर्चा

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

मराठा आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नांदेड येथील निवासस्थानावर मोर्चा नेत धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सकल मराठा, छावा संघटनेसह अनेक संघटना सामील झाल्या

नांदेड : मराठा आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नांदेड येथील निवासस्थानावर मोर्चा नेत धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सकल मराठा, छावा संघटनेसह अनेक संघटना सामील झाल्या.

आरक्षणाचा आद्यादेश त्वरीत काढा अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. या आंदोलनात छावा संघटनेचे प्रमुख नानासाहेब जावळे पाटील सहभागी झाले आहेत. आंदोलनकर्ते अशोक चव्हाण यांच्या निवासस्थाना समोर आंदोलनर्ते आणि पोलिस यांची शाब्दिक बाचाबाची झाली. अशोक चव्हाण यांनी बाहेर येऊन आमचं निवेदन स्विकारावे आणि आमचे म्हणणे ऐकुण घ्यावी अशी आग्रही भूमिका घेतल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. आंदोलनात शेकडो कार्यकर्त्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. अशा वेळी महाराष्ट्र शासन मेगाभरती करत आहे. हा मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. तसे ट्वीट त्यांनी केले आहे. दरम्यान, राज्य शासनाच्या पोलीस भरतीबाबतही खासदार संभाजीराजे यांनी नाराजी व्यक्त करत सरकारला इशारा दिला आहे. दुसरीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या खंडपीठासमोर आहे. यामुळे राज्य सरकारने पोलिस भरती करू नये, पोलिस भरती थांबविली नाही, तर मराठा समाजाचा आक्रोश रस्त्यावर दिसेल, असा इशारा खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी राज्य सरकारला दिला आहे. 

तामीळनाडू राज्यात मद्रास उच्च न्यायालयाने ६९ टक्के आरक्षण रद्द केले होते. तरीही तेथील सरकारने एक दिवसही आरक्षणाचे काम थांबविले नाही. तेथील राजकिय एकजुटीमुळे हे शक्‍य झाले असून तशीच एकजूट महाराष्ट्रात दाखवावी. तरच आम्ही आरक्षण प्रश्‍नावर पुढाकार घेऊ, असे स्पष्ट करून  मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी सर्व राजकिय पक्ष आणि लोकप्रतिनिधींची आहे. त्यासाठी सरकारने त्वरीत दोन्ही सभागृहाचे विशेष अधिवेशन बोलवावे,  अशी मागणी साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख