बीड : मागच्या जिल्हा नियोजन समिती बैठकीत बीड नगर परिषदेबाबत झालेल्या निर्णयांचे अनुपालन अहवाल दुसऱ्या बैठकीत आलेच नाहीत. त्यामुळे सभागृह सदस्यांनी पालिका सीओंवर संताप व्यक्त केला. समितीचे अध्यक्ष आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही मग डॉ. उत्कर्ष गुट्टे यांना बाहेरचा रस्ता दाखविला.
पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या शिरसाट, आमदार प्रकाश सोळंके, आमदार विनायक मेटे, आमदार नमिता मुंदडा, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार संदीप क्षिरसागर, आमदार लक्ष्मण पवार, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा नियोजन अधिकारी अपर्णा गुरव, अपर पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार उपस्थित होते.
यापूर्वीच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बीड नगर परिषदेबाबत झालेल्या ठरावांचे अनुपालन अहवाल नसल्याने मुख्याधिकारी डॉ. उत्कृर्ष गुट्टे यांना विचारणा करण्यात आली. मात्र, त्यांच्या उत्तरांनी समाधान न झाल्याने त्यांना सभागृहातून बाहेर काढण्यात आले. यावेळी त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाला पाठविण्याचाही ठराव घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
दरम्यान, बीड नगर पालिकेवर क्षीरसागरांची सत्ता आहे. डॉ. भारतभूषण क्षीरसागर नगराध्यक्ष असून त्यांचे राजकीय विरोधक पुतणे आमदार संदीप क्षीरसागर यांचे बंधू उपनगराध्यक्ष आहेत. दोन्ही काका पुतण्यांमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप नेहमीचे सूरु असतात. त्यातच आता बीड पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना असा बाहेरचा रस्ता दाखविल्याने त्याचेही राजकीय पडसाद उमटत आहेत.
हे ही वाचा...
अनिल देशमुख काटोलमधून गायब : पुतण्याची टीका
नागपूर : गृहमंत्री अनिल देशमुख आणि पुतणे काँग्रेस नेते आशिष देशमुख या काका-पुतण्यामधली वाद पुन्हा चव्हाट्यावर येण्याची चिन्हं आहेत. गृहमंत्री काटोलमधून गायब असल्याची टीका आशिष देशमुखांनी केली आहे.
अनिल देशमुख हे नागपुरातील काटोल या आपल्याच मतदारसंघातून गायब आहेत. त्यांच्यावर काटोलची जनता नाराज आहे. गेल्या सव्वा वर्षात कोणतीही कामं झालेली नाहीत, त्यामुळे मी सक्रिय व्हावं, अशी जनता आणि कार्यकर्त्यांची मागणी होती” असं आशिष देशमुख म्हणाले आहेत. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी परवानगी घेऊन मंदिर, शाळेत क्लासेस घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
काटोलमध्ये विधानसभा मतदारसंघात पुन्हा सक्रिय झाल्याचं सांगत आशिष देशमुखांनी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेतही दिले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सर्वच मतदारसंघात फिरतात, आगामी काळात काँग्रेस सत्तेत येणार, असा विश्वासही आशिष देशमुखांनी बोलून दाखवला. अनिल देशमुख औरंगाबादमध्ये कोणाकोणासोबत दिसतात, असा टोलाही त्यांनी काकांना लगावला आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत आशिष देशमुख भाजपच्या तिकिटावर काटोल मतदारसंघातून विजयी झाले होते. राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले अनिल देशमुख यांना त्यांनी पराभव केला होता. परंतु वेगळ्या विदर्भाची मागणी करत आशिष देशमुखांनी 2018 मध्ये आमदारकी आणि भाजपचा राजीनामा दिला आणि काँग्रेसमध्ये घरवापसी केली.
Edited By - Amol Jaybhaye

