मी कुठे जाणार ; चिंता व भविष्यवाणी करु नका : पंकजा मुंडे - Don't worry and predict where I will go: Pankaja Munde | Politics Marathi News - Sarkarnama

मी कुठे जाणार ; चिंता व भविष्यवाणी करु नका : पंकजा मुंडे

प्रशांत बर्दापूरकर
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

मी शिवसेनेत जाणार की,आणखी कुठे जाणार? अशा अफवा व भविष्यवाणी माझे हितचिंतक विनाकारण करत आहेत. 

अंबाजोगाई : मी शिवसेनेत जाणार की, आणखी कुठे जाणार? अशा अफवा व भविष्यवाणी माझे हितचिंतक विनाकारण करत आहेत. मात्र, त्याची चिंता व भविष्यवाणी करु नका असा खरपूस समाचार भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी घेत विरोधकांना खडे बोल सुनावले.     

आमदार नमिता मुंदडा यांच्या यांच्या निवासस्थानी पंकजा मुंडे यांचा राष्ट्रीय सचिवपदी निवडीबद्दल सत्कार झाला. आमदार नमिता मुंदडा, भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, अंबासाखरचे अध्यक्ष रमेशराव आडसकर, मोहन जगताप, राम कुलकर्णी, बाळासाहेब दोडतले, अक्षय मुंदडा, तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे उपस्थित होते.

पंकजा मुंडे म्हणाल्या, भारतीय जनता पक्षाने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्तीला पक्षाचे राष्ट्रीय सचिव पद देऊन आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू.कोरोनामुळे लोकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी मी स्वत:च घराबाहेर पडणे टाळले याचा मोठा गैरअर्थ काढुन, पंकजा मुंडे घराबाहेर पडत नाहीत. अशा अफवा पसरविण्यात आल्या. 

कोरोनाच्या काळात एकही सत्ताधारी कोविड सेंटरकडे फिरकला नाही. अशा परिस्थितीत खासदार डॉ. प्रीतम मुंडे व अक्षय मुंदडा कोविड सेंटरमध्ये जाऊन रुग्णांच्या भेटी घेतल्या, दिलासाही दिला. तरीही माझ्याबद्दल अफवा का पसरविल्या जातात हेच मला समजत नाही. आताही मी शिवसेनेत जाणार का कुठे जाणार? अशा अफवा पसरविल्या जात आहेत. माझ्या भविष्याची चिंता तुम्ही करू नका. 

मी स्वत: खंबीर आहे. माझ्या पक्षाने मला भरपूर दिलंय. तसेच गोपीनाथराव मुंडे यांची शिदोरी माझ्या पाठीशी भक्कम आहे. त्यामुळे तुम्ही माझी चिंता सोडा.अशा शब्दात अफवा पसरविणा-यांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला.  मी या निवडणुकीत पराभूत झाले असले तरी लोकांपासून दुरावले नाही. इंदिरा गांधींपासून अनेकांनी पराभवांचा अनुभव घेतला. यात मी नवीन नाही. मात्र, जनतेशी जुळलेली नाळ तुटू देणार नाही. आता पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी दिल्याने पुन्हा जोमाने  कामाला सुरुवात केली असल्याचे त्यांनी सांगितले. 

मी मंत्री असतांना जिल्ह्यात विकास कामांसाठी भरघोस निधी आणला. या सरकारमध्ये तो निधी वापस गेला. मात्र, यांना कामे करता आले नाहीत. तुम्ही आमच्याच कामांचे नारळ फोडत आहात. काही तरी नवीन आणा. अशा शब्दात त्यांनी नाव न घेता टीका केली. 

ऊसतोड कामगार व शेतकरी माझे विरोधी नाहीत. या ऊसतोड कामगारांना २१ रुपये दरवाढ द्या, ते कामावर भविष्यात या कामगारांचं होणारे नुकसान कसं भरून काढायचं हे मी पाहते. मात्र, त्यांना संकटात टाकणार नाही.

दसरा होताच कोयते घेऊन ते कामावर निघतील. परंतू, त्यांना २१ रुपये दरवाढ द्या. अशी मागणीही पंकजा मुंडे यांनी यावेळी केली. अक्षय मुंदडा म्हणाले की, पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पक्षवाढीसाठी काम करु. प्रास्ताविक आमदार नमिता मुंदडा यांनी केले. संचालन वैजनाथ देशमुख यांनी तर आभार अ‍ॅड. संतोष लोमटे यांनी मानले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख