धनंजय मुंडे दारात दिसताच गर्जे कुटुंबीयांनी 'माझा भाऊ आला' म्हणत हंबरडा फोडला 

जिल्ह्यातील आष्टीसह गेवराई व इतर काही तालुक्‍यांत बिबट्याने दहशत माजविली आहे. दोन दिवसांत आष्टी तालुक्‍यात नरभक्षक बिबट्याने दोन बळी घेतले आहेत. बिबट्याने बळी घेतलेल्या नागनाथ गर्जे कुटुंबीयांची पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेतली.
Dhananjay Munde consoled the Nagnath Garje family
Dhananjay Munde consoled the Nagnath Garje family

बीड : बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या नागनाथ गर्जे कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी शनिवारी (ता. 28 नोव्हेंबर) राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे सुरुडी येथे आले होते. गर्जे यांच्या दारात जाताच नागनाथ यांची आई, पत्नी व बहिणींनी "माझा भाऊ आला' म्हणत हंबरडा फोडला. 

नागनाथ गर्जे हा माझा अत्यंत जवळचा होता, मी त्याला दाजी म्हणायचो, माझ्या बहिणीची व नागनाथच्या दोन्ही मुलांची जबाबदारी मी स्वीकारतो, असे म्हणत बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या नागनाथ गर्जे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. नागनाथचा मुलगा व मुलगी या दोन्ही अपत्याच्या शिक्षणाची जबाबदारी आपण स्वीकारत असून त्यांच्या पत्नीला शासकीय सेवेत नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुंडे यांनी या वेळी सांगितले. 

आष्टी तालुक्‍यातील सुरुडी व किन्ही या दोन ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात नागनाथ गर्जे, तसेच मामाच्या गावी आलेला नऊ वर्षीय यश उर्फ स्वराज भापकर अशा दोघांचे बळी घेतले आहेत. त्यामुळे या भागात बिबट्याची दहशत आणि भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, शनिवारी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गर्जे कुटुंबीयांची तसेच यश उर्फ स्वराज भापकर याच्या मामाकडे असलेल्या नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन केले. 

नागनाथ गर्जे यांच्या कुटुंबास सरकारच्या वतीने पाच लाख रुपयांचा धनादेश या वेळी वनाधिकारी तेलंग यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच, नागनाथ यांच्या दोन्ही मुलांच्या नावे योजनेप्रमाणे प्रत्येकी पाच लाख रुपयांचा एफडी करून त्याच्या पावत्या कुटुंबाकडे देण्याच्या सूचना धनंजय मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचबरोबर स्वराज भापकर याच्या मावशी-काका यांसह अन्य नातेवाईकांचीही भेट घेऊन या चिमुकल्याच्या कुटुंबसही याच योजनेअंतर्गत 15 लाखांची मदत मिळवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

दरम्यान या दोन घटनांमुळे आष्टी तालुक्‍यात भीतीचे वातावरण असून बिबट्याला तातडीने जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून आखण्यात आलेल्या उपाययोजनांचा मुंडेंनी आढावा घेतला. बिबट्याला पकडण्यासाठी शार्पशूटर, पिंजरे, सापळे यासह ड्रोनची मदत घेतली जात असल्याचे यावेळी वनाधिकारी तेलंग म्हणाले. 

आपण वनमंत्री संजय राठोड यांच्याशी या विषयी चर्चा केली असून या बिबट्याला तातडीने पकडण्यासाठी नांदेड, जुन्नर, पुणे, औरंगाबाद, अमरावती आदी ठिकाणांहून शार्प शूटर व अन्य तज्ज्ञांची आणखी एक कुमक दाखल होणार असल्याचे मुंडे म्हणाले. येत्या तीन दिवसांत या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले नाही तर, आपण स्वतः शार्पशूटरमार्फत त्याला ठार करण्याची परवानगी वन्य जीव विभागाकडून घेऊ, असेही धनंजय मुंडे यांनी ग्रामस्थांशी सांगितले. 

मुंडे यांच्यासमवेत आमदार बाळासाहेब आजबे, साहेबराव दरेकर, बजरंग सोनवणे, शिवाजी राऊत, सतीश शिंदे, अण्णासाहेब चौधरी, रामकृष्ण बांगर, सुनील नाथ, शिवाजी नाकाडे, शिवाजी शेकडे, शिवाजी डोके आदी होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com