यावेळी ही भाजप जिल्हाध्यक्ष मस्केंना गावची ग्रामपंचायत जिंकता आली नाही - BJP district president's village gram panchayat to NCP | Politics Marathi News - Sarkarnama

यावेळी ही भाजप जिल्हाध्यक्ष मस्केंना गावची ग्रामपंचायत जिंकता आली नाही

दत्ता देशमुख  
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

मागच्या वेळी राजेंद्र मस्के शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष होते. त्यावेळी त्यांना बीडजवळ असलेल्या त्यांच्या पालवण गावची ग्रामपंचायत जिंकता आली नव्हती. आताही त्यांनी मातब्बरांना सोबत घेतले पण ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकला. 

बीड : भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचे गाव असलेल्या पालवण ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत त्यांनी भाजपचा कट्टर विरोधक शिवसंग्राम, शिवसेना यांनाही साथीला घेतले. पण, सर्व मातब्बरांना लोळवत राष्ट्रवादीने सरपंच - उपसरपंचपद मिळवले.

मराठा महासंघ, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसंग्राम आणि आता भाजप असा राजेंद्र मस्के यांचा प्रवास आहे. दोन वेळा जिल्हा परिषद सदस्यपद त्यांच्या घरात राहीले. मागच्या वेळी शिवसंग्राममध्ये असताना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपदही त्यांच्या पत्नी जयश्री मस्के यांच्याकडे होते. विशेष म्हणजे शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्षपद आणि नंतर युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्षपदाची माळही त्यांच्याच गळ्यात होती. शिवसंग्राममध्ये मस्के म्हणतील तीच पुर्व दिशा होती. 

दरम्यान, त्यांनी शिवसंग्रामला काडीमोड दिल्यानंतर काही दिवसांनी जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता गेली. परंतु, पंकजा मुंडे यांनी त्यांच्या गळ्यात जिल्हा परिषदेची माळ घातली.  शिवसंग्राम व भाजपमध्ये प्रमुख पदांवर असल्याने राज्यस्तरीय नेत्यांचा आणि अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांचा वावर असतो. 

मात्र, बीड शहराला खेटून असलेल्या त्यांच्या गावची ग्रामपंचायत काही त्यांना जिंकता आली नाही. जिल्ह्याचा कारभार करण्यामुळे गावाकडे दुर्लक्ष झाले म्हणावे तर पालवण आणि बीड एकत्रच झालेले आहे. विशेष म्हणजे चार-दोन दिवसांनी मस्के गावाकडेही असतात.  मागच्या वेळी जिल्हा परिषद सदस्य, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष असतानाही त्यांच्या विरोधी गटाकडेच ग्रामपंचायतीची सत्ता होती. 

यावेळी त्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आणि काहीही करुन ग्रामपंचायत ताब्यात घेण्याचा चंग बांधला. त्यासाठी त्यांनी विस्तवही आडवा जात नसलेल्या स्थानिक शिवसंग्राम आणि शिवसेनेलाही साथीला घेतले. पण, सर्व मातब्बरांवर मात करत सरपंच - उपसरपंच निवडीत राष्ट्रवादीनेच बाजी मारली. 

आमदार संदीप क्षीरसागर समर्थक ताई नजान सरपंच झाल्या तर अश्विनी मस्के उपसरपंच झाल्या. सलग दोन वेळा भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांना गावची ग्रामपंचायत जिंकता आली नाही. त्यांच्यासोबत संघटनेत असलेल्या अनेक साथीदारांची ताकतही अशीच काही प्रमाणतात कमी - अधिक असल्याने त्यांना तरी कोण काय म्हणणार.
 
Edited By - Amol Jaybhaye  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख