दानवेंना निमंत्रण नसल्याने आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमावर भाजपचा बहिष्कार  - BJP boycotts Aditya Thackeray's program in Aurangabad | Politics Marathi News - Sarkarnama

दानवेंना निमंत्रण नसल्याने आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमावर भाजपचा बहिष्कार 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 16 जानेवारी 2021

या कार्यक्रमाचे निमंत्रण भाजपला देण्यात आलेले आहे. 

औरंगाबाद : युवा सेनेचे अध्यक्ष तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत स्मार्ट सिटी व औरंगाबाद महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण आज (ता. 16जानेवारी) होत आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण भाजपला देण्यात आले असले, तरी स्थानिक नेत्यांनी मात्र या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. 

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या मतदार संघातील विकास कामांचे उद्‌घाटन आदित्य ठाकरे करणार आहेत, त्या कार्यक्रमाचे निमंत्रण खासदार म्हणून दानवे यांना देण्यात आलेले नाही. निमंत्रण पत्रिकेत त्यांचे नावदेखील नाही, असा आरोप भाजपचे खासदार डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे यांनी करत या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचे जाहीर केले. 

औरंगाबाद महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात शिवसेनेने विकास कामांचे उद्‌घाटन, भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याचा धडाका सुरू केला आहे. गेली पंचवीस वर्ष शिवसेनेसोबत सत्तेत असलेल्या भाजपचा आता मात्र शिवसेनेला कडाडून विरोध होत आहे. ठाकरे यांच्या उपस्थितीत आज होणाऱ्या या कार्यक्रमाचे निमंत्रण भाजपचे आमदार अतुल सावे, खासदार कराड यांना देण्यात आले होते. परंतु भाजपने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आगामी काळात शिवसेनेला टोकाच्या विरोधाची भूमिका असणार असल्याचे स्पष्ट केले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 12 डिसेंबर 2020 रोजी औरंगाबाद शहराच्या पाण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या 1680 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन केले होते. यासह सफारी पार्क व इतर विकास प्रकल्पांचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते झाले. परंतु यापैकी एकाही कामाची वर्कऑर्डर किंवा प्रत्यक्ष कामाला सुरुवात दीड महिना उलटून गेला तरीही झालेली नाही. मग केवळ भूमिपूजन करायची आणि शांत बसायचे, अशा कार्यक्रमांना आम्ही का जावे? असा सवाल सावे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला. 

आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज शहरात होणाऱ्या कचरा प्रक्रिया प्रकल्प, सायकल ट्रॅकसह अन्य कामांचे उद्‌घाटन हादेखील निवडणुकीच्या तोंडावर घातलेला घाट आहे. कारण ही सर्व कामे यापूर्वीच पूर्ण झालेली आहेत, झालेल्या कामांचे नव्याने उद्‌घाटन करण्याची गरज काय? असा प्रश्नही सावे यांनी केला. शहरातील कचरा प्रकल्पासाठी राज्यात भाजपची सत्ता असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 88 कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्याच प्रकल्पाचे उद्‌घाटन आता आदित्य ठाकरे करत आहेत, असा आरोपही सावे यांनी केला. 

शिवसेनेच्या ज्या मंत्र्यांचा महापालिकेच्या कामाशी थेट संबंध नाही, अशा संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार यांची नावे निमंत्रण पत्रिकेत टाकण्यात आली आहेत. परंतु भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांच्या मतदार संघातील काही प्रकल्पांचे उद्‌घाटन होत असताना त्यांचे नाव मात्र निमंत्रण पत्रिकेत टाकण्यात आलेले नाही, याचा निषेध म्हणून आम्ही कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला असल्याचेही सावे, कराड यांनी सांगितले. 

लसीकरण मोहिमेकडे दुर्लक्ष 

औरंगाबाद महापालिका व पालकमंत्री सुभाष देसाई यांनी देशभरात सुरू असलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही यावेळी कराड, सावे यांनी केला. गेल्या दहा महिन्यांपासून देश, महाराष्ट्र आणि शहरातील लाखो लोक कोरोनासारख्या जागतिक महामारीशी लढत आहेत. 

शासकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, डॉक्‍टर, सफाई कर्मचारी, नर्स अशा अनेक कोरोना योद्धांनी जीव धोक्‍यात टाकून नागरिकांच्या प्राणांचे रक्षण केले, अशा कोरोना योद्धांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरण मोहीम सुरू केली आहे. पण, महापालिकेने लसीकरणाच्या मोहिमेला दुय्यम स्थान देत शहरातील आधीच झालेल्या विकासकामांचे उद्‌घाटन आणि लोकार्पण सोहळ्याला अधिक प्रसिद्धी आणि महत्त्व दिले. याचादेखील भाजप निषेध करते, अशा शब्दांत सावे आणि कराड यांनी या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकत असल्याचे जाहीर केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख