बैठकीला बोलावून थोबडीत हाणून दरवाजातून बाहेर काढणे अमान्य  - We are Beedwale and we not afraid of struggle : Suresh Dhas | Politics Marathi News - Sarkarnama

बैठकीला बोलावून थोबडीत हाणून दरवाजातून बाहेर काढणे अमान्य 

सरकारनामा ब्यूरो 
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

गाऱ्हाणं मांडायला मी तुम्हाला एवढा लेचापेचा वाटतो का? मी अजिबात लेचापेचा नाही.  

पुणे : आम्हाला बैठकीचा निरोप द्यायचा, सन्मानाने बोलवायचे आणि दारात येऊन थोबडीत हाणून माघारी निघा म्हणायचं, ही पद्धत आम्हाला आवडलेली नाही. आम्ही बीड जिल्हावाले आहेत. आम्ही संघर्षाला घाबरत नाही, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे बीडचे आमदार सुरेश धस यांनी दिला. 

ऊस तोडणी कामगारांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत ऊस तोडणी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची आज (ता. 27 ऑक्‍टोबर) मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठक बोलवण्यात आली होती.

या बैठकीत धस यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. मात्र त्यानंतर त्यांनी गेटवरच आंदोलन सुरू केले होते, त्यानंतर त्यांना बैठकीत प्रवेश देण्यात आला होता. 

बैठकीस सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह इतर संघटनांच्या प्रतिनिधींना बोलावण्यात आले होते. सुरेश धस हे गेले काही दिवस आक्रमकपणे या मजुरांचे प्रश्न मांडत आहेत. तसेच तोडगा निघाल्याशिवाय मजुरांना साखर कारखान्यावर जाऊ नये, असे आवाहन ते करत होते. तसेच मजुरी दरात शंभर टक्‍क्‍यांहून अधिक वाढीची आक्रमक मागणी त्यांनी केली होती. 

हे राजकारण बीडवाल्यांनीच केले का?

बैठक संपल्यानंतर धस माध्यमांशी बोलत होते. बैठकीला न बोलविण्याचे राजकारण बीडवाल्यांनीच केले का? या प्रश्‍नावर धस म्हणाले की, ज्यांनी कोणी हे केले, त्यांना बाहेर आल्यानंतर विचारा. हा असला प्रकार ज्येष्ठ नेते शरद पवार आणि (स्व.) गोपीनाथ मुंडे यांनी कधी केला नाही. मी दोनदा ऊसतोड मजुरांच्या मजुरीवाढीबाबत नेमण्यात आलेल्या लवादाच्या बैठकीला उपस्थित होतो, त्यावेळी असे प्रकार घडले नाहीत. 

मी काय आंडपांडू आहे का? 

ज्या व्यक्तीने तुम्हाला बैठकीला बोलावले नाही. तुमच्यावर अन्याय केला म्हणता. त्याबाबत शरद पवारांकडे गाऱ्हाणं मांडलं का? या प्रश्‍नावर धस उसळून येत म्हणाले की गाऱ्हाणं मांडायला मी तुम्हाला एवढा लेचापेचा वाटतो का? मी अजिबात लेचापेचा नाही. मी आंडूपांडू नाही. 

ते तुम्ही धनंजय मुंडेंनाच विचारा 

काही लोक पराभवाची वर्षपूर्ती साजरी करायलाच जिल्ह्यात येतात, अशी टिका सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर केली होती. त्याबाबत विचारले असता सुरेश धस म्हणाले की, त्याबाबत तुम्ही धनंजय मुंडे यांनाचा विचारा. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख