जावयाचे नाव घेताच दानवे भडकले आणि म्हणाले...  - Raosaheb Danve got angry when he asked a question about his son-in-law Harshvardhan Jadhav | Politics Marathi News - Sarkarnama

जावयाचे नाव घेताच दानवे भडकले आणि म्हणाले... 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 14 फेब्रुवारी 2021

आगामी निवडणुकीत जो मित्रपक्ष सोबत असेल त्याच्यासह आणि जो नसेल त्याच्याशिवाय भाजप लढणार असल्याचे दानवे म्हणाले. 

औरंगाबाद : पत्रकार परिषद संपल्यानंतर बाहेर जाताना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना एका पत्रकाराने त्यांचे जावई, माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याविषयी प्रश्‍न विचारल्यानंतर मंत्री दानवे चांगलेच भडकले. "तुम्ही जावयालाचा विचारा' असे सांगत त्यावर बोलणे टाळत दानवे तेथून निघून गेले. 

या पत्रकार परिषदेत विविध मुद्यांवरून रावसाहेब दानवे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. ते म्हणाले की केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी मेट्रो, रस्ते इतर योजनासाठी भरीव अशी आर्थिक तरतुदी करण्यात आल्या आहेत. आता राज्याने विकास कामामध्ये कुठलीही आठकाठी न आणता कामे सुरु करावेत. 

केंद्रीय अर्थसंकल्पात राज्यातील 328 रस्त्यांसाठी एक लाख 33 हजार 255 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली, असून मुंबई, पुणे आणि नाशिक ही शहरे मोठी असून तेथे मेट्रो रेल्वेसाठी अधिकची तरतूद झाली आहे. रस्ते, वीज, पाणी, रेल्वे, मेट्रो,मालवाहतूक मार्गिका, बंदरे, वाहनतळासाठी ही तरतूद करण्यात आली असल्याचे दानवे म्हणाले. 

मराठवाड्यातील यासह ड्रायपोर्टसाठी नव्या तरतुदीची गरज नव्हती. पूर्वी करण्यात आलेल्या 350 कोटी रुपयांच्या तरतुदीतून संरक्षण भिंत आणि मालवाहतुकीसाठी लागणारे रूळ टाकण्याचे काम सुरू आहे. दोन शेतकऱ्यांच्या जमिनीचा वाद आहे. त्या अनुषंगाने लवकरच बैठक घेणार आहे, असेही दानवे यांनी नमूद केले. 

वाढत्या इंधन दराबाबत प्रश्‍नावर दानवे यांनी सांगितले की, इंधनावर राज्य सरकारतर्फे जो कर लावण्यात येतो. तो कमी केल्यास इंधनाच्या दरावर नियंत्रण येईल. 

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात मंत्री संजय राठोड यांचे नाव घेतले जात आहे. या संदर्भात दानवे म्हणाले की, ज्या पक्षांनी महिलावरील अन्याय, अत्याचार विरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन केली, त्यांनी आता आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजेत. सत्य बाहेर आणून कायदेशीर कारवाई करावी, असेही दानवे म्हणाले. औरंगाबाद महापालिकेच्या आगामी निवडणुकीत जो मित्रपक्ष सोबत असेल त्याच्यासह आणि जो नसेल त्याच्याशिवाय भाजप महापालिका निवडणूक लढविणार असल्याचेही दानवे म्हणाले. 

हेही वाचा : त्या क्‍लिपमधील आवाज संजय राठोडांचाच : भाजप आमदार येरावारांचा आरोप 

यवतमाळ : एखाद्या मंत्र्यांवर आरोप होत असेल; तर त्या मंत्र्यांनी स्वत:हून पुढे आले पाहिजे. आठ दिवस होऊनसुद्धा एवढ्या ऑडिओ क्‍लिप समाजमाध्यमांवर फिरत असतानाही चौकशी होत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात असलेले महाविकास आघाडीचे सरकार हे महिलांप्रती किती सजग आहे, स्त्रीयांचा किती आदर करणारे आहे, हे या घटनेवरून दिसून येते. 

महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून पूजा चव्हाण नामक युवतीने आत्महत्या केल्याची चर्चा समाज माध्यमांवर सुरू आहे. यापूर्वीही एका मंत्र्यांवर एक महिलेने आरोप केले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार नसून हनीमून सरकार असल्याचा आरोप भाजप नेते तथा माजी राज्यमंत्री मदन येरावार यांनी रविवारी (ता.14 फेब्रुवारी) माध्यमांशी बोलताना केला. 

पुण्यातील महंमदवाडी हडपसर येथील एका उच्चभ्रूंच्या सोसायटीच्या पहिल्या माळ्यावरून पूजा चव्हाण या 22 वर्षीय युवतीने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. पुणे येथील युवतीच्या आत्महत्या प्रकरणी विरोधकांकडून शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना जबाबदार धरले जात आहे. तिच्या आत्महत्या प्रकरणाशी निगडित असलेल्या काही ऑडिओ क्‍लिपही व्हायरल झाल्या आहेत. या प्रकरणावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलेच शाब्दिक "वार' सुरू आहेत. 

या वादात माजी राज्यमंत्री तथा भाजपचे आमदार मदन येरावार यांनी उडी घेत महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर व्हायरल झालेल्या बाराही क्‍लिपमध्ये संजय राठोड यांचा आवाज आहे. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. राठोड, अरुण आणि पूजाचा मोबाईल पोलिसांनी जप्त करायला पाहिजे. संजय राठोड यांनी स्वतः समोर येऊन खुलासा करावा, असा सल्लाही येरावार यांनी दिला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख