वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुखांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर 

वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्‍यक निधी देण्यात येईल.
Amit Deshmukh slammed the officials for the arbitrary and careless management of MSEDCL
Amit Deshmukh slammed the officials for the arbitrary and careless management of MSEDCL

लातूर : रोहित्र बंद पडणे, त्यांची दुरुस्ती लवकर न होणे, दुरूस्त रोहित्र पुन्हा बंद पडणे, अखंडित वीज पुरवठा आदी प्रकारांमुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. त्यामुळे सोमवारी (ता. 25 जानेवारी) झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. सुरळीत वीज पुरवठ्याचा आराखडा तयार करा, वीज वाहिनीच्या दुरुस्तीसाठी तातडीने विशेष मोहीम राबवा, असे आदेश त्यांनी दिले. 

या वेळी पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, खासदार सुधाकर शृंगारे, आमदार संभाजी पाटील नीलंगेकर, आमदार विक्रम काळे, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार धीरज देशमुख, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा नियोजन अधिकारी एम. एस. दुशिंग, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी उपस्थित होते. 

पालकमंत्री देशमुख म्हणाले, "वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्‍यक निधी देण्यात येईल. रोहित्रांची तातडीने दुरूस्ती करून पुढील दोन महिन्यांत वीज पुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घ्यावी. यंदा दुरूस्त केलेल्या रोहित्रांची संख्या तसेच नादुरूस्त रोहित्र वेळेत दुरुस्त करूनही पुन्हा नादुरुस्त झालेल्या रोहित्रांचा लेखी अहवाल सादर करावा. ग्रामीण भागातील वीज वाहिनींच्या दुरुस्तीसाठी विशेष मोहीम राबवावी.'' 

जलजीवन मिशनमधून ग्रामीण भागात प्रत्येक घराला नळजोडणी देण्याचे काम वेगाने सुरू असल्याचे राज्यमंत्री बनसोडे यांनी सांगितले. या वेळी चालू वार्षिक योजनेचा शंभर टक्के निधी खर्च करण्याचे आदेश देशमुख यांनी दिले. येत्या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात आलेल्या 321 कोटी 4 लाख 29 हजार रुपयांच्या प्रारूप आराखड्याला या वेळी मान्यता देण्यात आली. 

जळगाव पॅटर्नची चर्चा 

जिल्हा नियोजन समितीच्या निधीशी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेसोबत सांगड घालून जळगाव जिल्ह्यात शाळा, ग्रामपंचायती व अंगणवाडी इमारतींसह संरक्षक भितींचे बांधकाम मोठ्या प्रमाणात झाले आहे. या जळगाव पॅटर्नची माहिती घेऊन जिल्ह्यात हा पॅटर्न कशा पद्धतीने राबवणे शक्‍य आहे, याचा अहवाल सादर करण्याचे आदेश मंत्री देशमुख यांनी दिले. 

निलंग्याच्या अभ्यास केंद्रास निधीची मागणी 

राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने करावे, रोहित्रांची तातडीने दुरुस्ती करावी, पाणीपुरवठा योजनांसाठी सौर ऊर्जा प्रकल्पाचे नियोजन करावे, पाणंद रस्त्यासाठी निधी द्यावा, निलंग्याच्या अभ्यास केंद्रासाठी निधी द्यावा, आदी मागण्या लोकप्रतिनिधींनी करत विविध प्रश्न उपस्थित केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com